जळगावातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावरील ६५० मीटर वीज वाहिन्या व खांब हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:01 PM2018-08-26T13:01:57+5:302018-08-26T13:03:47+5:30

पूल पाडण्यापूर्वीचा पहिला टप्पा पूर्ण

Shivajinagar Railway Bridge in Jalgaon, 650 meter power channel and pillars have been removed | जळगावातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावरील ६५० मीटर वीज वाहिन्या व खांब हटविले

जळगावातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावरील ६५० मीटर वीज वाहिन्या व खांब हटविले

googlenewsNext
ठळक मुद्देआठ तास वाहतूक बंदने नागरिकांचे हालरेल्वेचा दोन तास मेगाब्लॉक

जळगाव : जीर्ण झालेला ब्रिटीशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल पाडण्यासाठी या पुलावरील अतिउच्च व उच्च दाबाच्या ६५० मीटर लांब वीज वाहिन्यांसह विद्युत खांब शनिवारी हटवून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यात आले. सलग आठ तास या पुलावरून वाहतूक बंद राहिल्याने शहरवासीयांचे हाल झाले. मात्र बहुप्रतीक्षीत या कामाला अखेर सुरुवात झाल्याबद्दल समाधानदेखील व्यक्त करण्यात आले. दरम्यान, या कामासाठी रेल्वेनेदेखील दोन तास मेगाब्लॉक घेत हे काम मार्गी लावले. संध्याकाळी पाच वाजता हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
१०० वर्षांहून अधिक जुना असलेला शिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण होऊन तो वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने या ठिकाणी नवीन पूल उभारण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ती आता पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलण्यात आले. पूल पाडण्याच्या पहिल्या टप्प्यात पुलावरील सर्व वीज वाहिन्या तसेत खांब हटवून नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासन पुढील कार्यवाही करण्याविषयी ठरले. त्यामध्ये शनिवार, २५ आॅगस्ट रोजी पहिल्या टप्प्यातील या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली.
तीन तासात हटविल्या वीज वाहिन्या
महावितरण तसेच रेल्वेच्या विद्युत विभागाने सकाळी ९ वाजता या भागातील वीज पुरवठा खंडीत करून कामाला सुरुवात केली. पुलावरून जाणाऱ्या ११ हजार व्होल्टच्या ३५० मीटर अतिउच्च दाबाच्या वाहिन्या तसेच ४४० व्होल्टच्या ३०० मीटर अशा एकूण ६५० वीज वाहिन्या टप्प्या-टप्प्याने काढून दुपारी बारावाजेपर्यंत सर्व वाहिन्या खांबावरून काढण्यात आल्या. यासह पुलावर असलेले चार मोठे खांब गॅस कटरच्या सहाय्याने कापून ते हटविण्यात आले.
आठ तास वाहतूक बंद
या कामासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ असे आठ तास हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना फेºयाने जावे लागत होते. यामध्ये शिवाजीनगरचा संपूर्ण परिसर, कानळदा, ममुराबाद, इदगाव, कोळन्हावी, किनगाव, धानोरा इत्यादी परिसरात जाणाºया नागरिकांना याचा अधिक फटका बसला.
अनेकांनी घातला वाद
सकाळी वाहतूक बंद केल्यानंतरही या ठिकाणी वाहनधारक पुलावरून जाण्याचा आग्रह करीत होते. मात्र वाहतूक पोलीस त्यांना रोखत असताना बºयाच जणांनी वादही घातला. मात्र मोठे काम असल्याने सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित सर्वच विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी केले. दिवसभर अनेक वाहनधारक या पुलावरुन जाण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र पोलिसांनी त्यांना रोखल्याने त्यांना माघारी जावे लागत होते. वीजवाहिन्या काढून व खांब पाडल्यानंतर ते जमा करीत-करीत दुपारी साडेचार वाजले. त्यानंतर हा पूल संध्याकाळी पाच वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
दोन तास रेल्वेचा ब्लॉक अन् एकाही रेल्वेचा खोळंबा नाही
उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यासह रेल्वेच्या २५ हजार व्होल्टच्या वीज वाहिन्यांचा पुरवठा बंद करून सकाळी १० ते दुपारी १२ असा दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला. यामध्ये रेल्वे गाड्यांनाही विलंब होऊ नये म्हणून सकाळी अहमदाबाद-हावडा गाडी रवाना झाल्यानंतर ब्लॉकला सुरुवात झाली. त्यानंतर सव्वा बारा वाजेदरम्यान येणाºया गीतांजली एक्सप्रेस रवाना होण्यापूर्वी पुलावरील वीज वाहिन्या हटविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या दोन तासादरम्यान एकाही गाडीचा खोळंबा होऊ दिला नसल्याचा दावा रेल्वेच्या अधिकाºयांनी केला.
या भागातील विद्युत फिडर ठेवले बंद
बळीराम पेठ, शास्त्री टॉवर, लाकूड पेठ, फॉरेस्ट कॉलनी हे फिडर या कामादरम्यान बंद ठेवण्यात आले होते. यामुळे सत्यमपार्क ते शिवाजीनगर, बळीराम पेठ, फुले मार्केट, दाणाबाजार, गोविंदा रिक्षा थांबा, खान्देश मिल परिसर या भागातील वीज पुरवठा बंद होता.
पूल पाडण्यासाठी बजरंग बोगद्यातील पाण्याचा निचरा होण्याची प्रतीक्षा
शिवाजीनगर उड्डाणपूल पाडण्यासाठी शनिवारी यावरील सर्व वीज वाहिन्या काढण्यात आल्या तरी पूल पाडण्यासाठी बजरंग बोगद्यातील साचलेले पाणी अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा पूल पाडण्यापूर्वी बजरंग बोगद्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले. या पाण्याचा निचरा झाल्यास हा मार्ग वाहतुकीस उपयोगी पडून शिवाजीनगर पूल पाडण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. त्यामुळे बजरंग बोगद्याचे काम झाल्यानंतर हा पूल पाडण्यास लगेच सुरुवात होऊ शकते. अन्यथा पावसाळ््यानंतरच हा पूल पाडण्यास प्रत्यक्ष सुरुवात होईल, असे अधिकाºयांनी सांगितले.
आता सा.बां. विभाग व रेल्वे करणार पुढचे नियोजन
शनिवारी वीज वाहिन्या काढल्या असल्या तरी आता पुढे कसे नियोजन असेल या बाबत सा.बां. विभाग व रेल्वे प्रशासन समन्वय साधून कार्यवाही ठरविणार असल्याचे रेल्वेच्या विद्युत विभागाचे उप मुख्य विद्युत अभियंता (निर्माण) एम.सी. मीना यांनी सांगितले.
सुरत रेल्वे फाटक ते रेल्वे स्थानक दरम्यान असेल पॉवर क्रॉसिंग
पुलावरील वीज वाहिन्या काढल्या असल्याने आता नवीन पूल तयार झाल्यानंतर वीज पुरवठ्यासाठी सूरत रेल्वे फाटक ते रेल्वे स्थानक दरम्यान ओव्हर हेड पॉवर क्रॉसिंग राहणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
मनपाने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे
आता पुढील प्रक्रिया सा.बां. विभाग व रेल्वे प्रशासन करणार असले तरी त्यासाठी अगोदर महापालिकेने पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. बजरंग बोगदा, लेंडी नाला व इतर मार्ग तयार असल्यास ते नागरिकांसाठी सोयीचे होईल व पूल पाडण्यासही अडथळा येणार नाही. त्यामुळे हे मार्ग झाल्यानंतर लगेच पूल पाडला जाऊ शकतो किंवा पावसाळा झाल्यानंतर या कामास सुरुवात होईल, असे सा.बां. विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत सोनवणे यांनी सांगितले.
२० सप्टेंबरपर्यंत पूल पाडण्याचे काम पूर्ण होणार
गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्या न कोणत्या अडथळ््यामुळे पुलाचे काम रखडत असल्याने आता सर्व उपाययोजना करून पूल कोणत्याही परिस्थितीत २० सप्टेंबरपर्यंत पडलेला दिसेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
आमदार सुरेश भोळे यांनी केली पाहणी
दुपारी हे काम सुरू असताना आमदार सुरेश भोळे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. काम जर लवकर झाले तर पाच वाजेपूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला करा, अशा सूचना त्यांनी या वेळीदिल्या.

रुग्णांची गैरसोय होणार
हा पूल तर पाडला जाईल, मात्र तो तयार होईपर्यंत पुलाच्या दुसºया बाजूने शहरात येण्यासाठी नागरिकांना फेºयाने यावे लागणार आहे. त्यात कोणाची प्रकृती खालावून ते अत्यवस्थ झाल्यास त्यांच्यासाठी काय सोय राहणार या बाबत मात्र कोणत्याही उपाययोजना नसल्याचे एकूण चित्र आहे.

अधिकारी, कर्मचाºयांचा ताफा
या कामाच्या ठिकाणी रेल्वेचे उपमुख्य अभियंता (निर्माण) एस.के. मीना, महावितरणचे सहाय्यक अभियंता एच.डी. इंगळे, विजय कापुरे, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, महावितरणचे शासकीय मक्तेदार आनंद विरघट यांच्यासह महावितरणचे १५ कर्मचारी, मक्तेदारांचे १७ कर्मचारी, वाहतूक शाखेचे १० पोलीस, रेल्वे पोलिसांचे १ निरीक्षक, १ पोलीस उपनिरीक्षक, १५ कर्मचारी असा ताफा या कामासाठी कामाच्या ठिकाणी होता.

नागरिकांमध्ये समाधान
शनिवारी झालेल्या या कामामुळे शहरवासीयांचे हाल झाले असले तरी यामुळे मात्र पुलाचे काम मार्गी लागणार असल्याने त्याचेही समाधान व आनंद असल्याचे शहरवासीयांचे म्हणणे होते.

Web Title: Shivajinagar Railway Bridge in Jalgaon, 650 meter power channel and pillars have been removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.