जळगावातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल १ मार्चपासून बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:40 PM2018-01-17T12:40:39+5:302018-01-17T12:41:45+5:30
रेल्वेकडे ४ निविदा प्राप्त
जळगाव : सुमारे १०० वर्षांहूनही अधिक जुन्या झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या जागी नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी रेल्वेच्या हिश्शाच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यांनी १ मार्च पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करून तो पाडण्याची परवानगी मनपाकडे पत्र पाठवून केली आहे. मात्र मनपाकडून त्यास प्रतिसाद मिळालेला नाही.
तर उर्वरित काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून त्यांच्याकडून अंदाजपत्रक व डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र मार्च महिन्यात बजेटमध्ये तरतूद झाल्यानंतरच त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया होणार आहे.
बांधकाम विभागाकडून प्रतिसाद नाही
महिनाभरात निविदा प्रक्रिया अंतिम होऊन १ मार्चपासून हा शिवाजीनगर पूल वाहतुकीसाठी बंद करून नवीन पूल बांधण्यासाठी जुना पूल तोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्याबाबत या पुलाचा वापर बंद करण्याबाबतचे पत्र रेल्वेकडून मनपाला पाठविण्यात आले आहे. मात्र मनपाकडून पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही त्यास प्रतिसाद दिलेला नाही. तसेच रेल्वेने या पत्राची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागालाही दिली असून त्यांच्या हिश्शाच्या पुलाचे बांधकाम करण्याबाबत काय नियोजन झाले? याची विचारणा केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही रेल्वेला प्रतिसाद मिळालेला नाही.
अर्थसंकल्पात करावी लागणार तरतूद
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रेल्वे त्यांच्या हद्दीतील पुलाचे काम करेल. तर उर्वरित जोड रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. त्यासाठी सुमारे २५ कोटींच्या खर्चाचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले असून नकाशे करणे सुरू आहे. मात्र या निधीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद होणे आवश्यक आहे. मार्च महिन्यात सादर होणाºया अर्थसंकल्पात याची तरतूद झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम यासाठी निविदा प्रक्रिया करेल. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होऊन मे महिन्यात पुलाला जोडणाºया रस्त्यांच्या कामाला सुरुवात होऊ शकेल, असे सांगितले.
शिवाजीनगर भागात पुलाला दोन रस्ते
वाहतुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या रेल्वे उड्डाणपुलाच्या शिवाजीनगरकडील भागात एक रस्ता शिवाजीनगर, जिल्हा दूध संघाच्या दिशेने जाणार तर दुसरा रस्ता सरळ खाली ममुराबाद रस्त्याकडे जाईल. तर जिल्हा परिषदच्या टोकाला जागा कमी असल्याने आहे त्या जागेतच पुलाचे बांधकाम करावे लागणार आहे. या पुलाची शेवटची कमान ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच बांधली जाणार आहे. त्याच्या उंचीवरच रेल्वेच्या पुलाची उंची ठरणार आहे. हे पुलाचे काम पूर्ण व्हायला किमान दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
४० कोटींचे अंदाजपत्रक... सुमारे १०० वर्षांहून अधिक जुन्या व जीर्ण झालेल्या शिवाजीनगर पुलाच्या जागी नवीन रेल्वे उड्डाणपूल उभारण्यासाठी रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाने जबाबदारी वाटून घेण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. या पुलासाठी सुमारे ४० कोटींचा खर्च येणार आहे. त्यापैकी रेल्वेने त्यांच्या हद्दीतील मुख्य पुलाचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक, आराखडे तयार करून निविदा प्रक्रियाही केली आहे. चार निविदा प्राप्त झाल्या असून १ महिन्याच्या आत निविदा अंतिम होऊन मक्तेदाराला कार्यादेशही दिले जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.