‘परिवर्तन’च्या सात फे-या बंद करीत जळगाव - औरंगाबाद मार्गावर ‘शिवशाही’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:48 PM2018-03-06T12:48:33+5:302018-03-06T12:49:17+5:30
बस सेवा
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ६ - प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या शिवशाही बस सेवेचा सोमवारपासून जळगाव ते औरंगाबाद सेवेचा शुभारंभ झाला. या सेवेच्या निमित्ताने जिल्ह्यातील परिवर्तन सेवेच्या एकूण सात फेºया रद्द करून त्या ठिकाणी शिवशाही बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
नाशिक व धुळे मार्गावरही लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यातून परिवर्तन सेवेला शिवशाहीद्वारे ‘ओव्हरटेक’ करीत उत्पन्न वाढीचा प्रयत्न महामंडळाकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे.
जळगाव येथून यापूर्वी पुणेपर्यंत शिवशाही बससेवेची एक फेरी दररोज सुरू आहे. त्यात आता औरंगाबाद मार्गावरही ही सेवा सुरू करण्यात आली असून ५ मार्च रोजी या सेवेचा शुभारंभ झाला. पहाटे सव्वा पाच वाजता पहिल्या फेरीच्या वेळी एका ज्येष्ठ प्रवाशांच्याहस्ते या सेवेचा शुभारंभ झाला. या वेळी आगार प्रमुख पी.एस. बोरसे, स्थानक प्रमुख नीलिमा बागूल उपस्थित होते.
पहिल्या दिवशी शिवशाहीच्या पहिल्या फेरीतून ९५०० रुपये उत्पन्न मिळाले. औरंगाबाद मार्गावरील प्रमुख थांब्यावरही या बसचा थांबा असून पहिल्या दिवशी किती प्रवासी संख्या होती, ते संध्याकाळपर्यंत उपलब्ध होऊ शकले नव्हते. मात्र अपेक्षित उत्पन्नाच्या निम्मेही हे उत्पन्न नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
जळगाव, भुसावळ आणि चाळीसगाव येथूनही सेवा
जळगावसह भुसावळ आगारातूनही औरंगाबादसाठी शिवशाहीच्या तीन फेºया सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच चाळीसगाव येथून ४ मार्चपासून पुणेसाठी रात्री ९.३० वाजता शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्याला एकूण १३ शिवशाही बसेस् मिळाल्या असून यात जळगाव आगाराला ८, चाळीसगावला २ तर भुसावळला ३ बसेस मिळाल्या आहेत. यातील चार बसेस भाडे तत्वावरच्या आहेत.
प्रवासी भाड्यात ९५ रुपयांची तफावत
परिवर्तन बसेस्ने औरंगाबादचे भाडे १७८ रुपये आहे तर शिवशाहीने २७३ रुपये भाडे आकारले जात आहे. ही बस वातानुकुलीत, पुशबॅक सीट व वायफाय सुविधा असलेली असून उन्हाळ््याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना याद्वारे आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जात आहे.
‘परिवर्तन’ थांबवून ‘शिवशाही’ पुढे
जळगाव व भुसावळ येथून परिवर्तन बसच्या औरंगाबादच्या प्रत्येकी तीन फेºया थांबवून त्या ठिकाणी शिवशाही सुरू करण्यात आली आहे तर महिनाभरापूर्वीच पुणेसाठीही रात्री ९.३० वाजता शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली. यामुळे आता शिवशाहीला प्रोत्साहन देण्यावर महामंडळाचा भर असल्याचे दिसून येत आहे.
दररोज तीन फे-या
औरंगाबादसाठी जळगाव येथून सकाळी ५.१५, ७.१५ व ९ अशा तीन वेळेस ही बससेवा आहे. तर भुसावळ (व्हाया जामनेर) येथून सकाळी ५.३०, ६.४५, ७.२५ अशा वेळा आहेत.
या पाठोपाठ आता धुळे व नाशिकसाठीदेखील जळगाव येथून शिवशाही बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे परिवहन महामंडळाच्यावतीने सांगण्यात आले.