भुसावळ रेल्वे मुख्य प्रवेशद्वाराची ‘टी-५५ बॅटल टँक’ वाढविणार शोभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:52 PM2018-12-16T23:52:04+5:302018-12-16T23:54:02+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी टी-५५ बॅटल टँक ठेवण्यात येणार आहे. यामुळे हे प्रवेशद्वार एक आकर्षण ठरणार आहे.
भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्याभुसावळ विभागातील भुसावळ स्थानकाचा डीआरएम आर.के.यादव यांनी चेहरामोहरा बदलला आहे. त्यात आणखी भर म्हणून जुन्या जीआरपी पोलीस ठाण्याच्या इमारतीला जमीनदोस्त करण्यात आले असून, मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी टी-५५ बॅटल टँक ठेवण्यात येणार आहे. यामुळे हे प्रवेशद्वार एक आकर्षण ठरणार आहे.
रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जाण्या-येण्यासाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. यानंतर जुन्या जीआरपी पोलीस ठाण्याची इमारत तोडण्यात आली आहे. रेल्वेस्थानकाची शोभा वाढावी याकरिता रेल्वे प्रशासनाने खडकी, पुणे येथून ४० टन वजन असलेल्या ९ बाय साडेतीन मीटरची लांबी व रुंदी असलेला टि-५५ बॅटल टँक आणला आहे. या टँकला पुणे येथून आणण्यासाठी तीन दिवस लागले. तो सोमवारी मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात येणार आहे. या टँकची रंगरंगोटी केल्यानंतर काही दिवसांनी त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सीनियर सेक्शन इंजिनिअर (वर्क) आर.एन.देशपांडे यांनी ‘लोकमत’ला दिली.