धक्कादायक! चार दिवसांत कमरेवर चार इंजेक्शन दिले; गँगरीन होवून बालकाचा मृत्यू, तिघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 09:35 PM2023-03-26T21:35:51+5:302023-03-26T21:36:24+5:30

Crime News: जळगाव तालुक्यातील पाथरी येथील दुर्वेश नाना पाथरवट (११) या बालकाला ताप आल्याने गावातील डॉक्टरांनी चार दिवसात कमरेवर चार वेळा तर एक वेळा हातावर इंजेक्शन दिले.

Shocking! Four injections were given to the waist in four days; Child's death due to gangrene, case against three doctors | धक्कादायक! चार दिवसांत कमरेवर चार इंजेक्शन दिले; गँगरीन होवून बालकाचा मृत्यू, तिघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

धक्कादायक! चार दिवसांत कमरेवर चार इंजेक्शन दिले; गँगरीन होवून बालकाचा मृत्यू, तिघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

- सागर दुबे
जळगाव :  जळगाव तालुक्यातील पाथरी येथील दुर्वेश नाना पाथरवट (११) या बालकाला ताप आल्याने गावातील डॉक्टरांनी चार दिवसात कमरेवर चार वेळा तर एक वेळा हातावर इंजेक्शन दिले. या इंजेक्शनमुळे बालकाच्या कमरेवर सेप्टिक होऊन कमरेपासून ते मांडीपर्यंत गँगरीन झाले होते. त्यामुळे बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. याप्रकरणी दीड वर्षांनी बालकाच्या आईच्या फिर्यादीवरून पाथरी गावातील डॉ. स्वप्नील युवराज पाटील, युवराज गंगाराम उर्फ जयराम पाटील आणि डॉ. सुभाष जाधव या डॉक्टरांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील वाघळुद येथील दुर्वेश पाथरवट हा पाथरी येथे आईसोबत मामाच्या गावी राहत होता. १० ऑक्टोबर २०२१ रोजी दुर्वेशला ताप आल्याने कुटुंबियांनी त्यास पाथरी गावातीलच डॉ. स्वप्निल पाटील यांच्या दवाखान्यात नेले होते. त्यांनी तपासून दुर्वेश यास कमरेवर एक इंजेक्शन व काही गोळ्या लिहून दिल्या. तीन दिवसांनी पुन्हा ताप आल्याने कुटुंबियांनी त्याला पुन्हा दवाखान्यात नेले. याठिकाणी डॉ. स्वप्निल पाटील नव्हते, तर डॉ. युवराज पाटील यांनी दुर्वेश यांच्या दोन्ही कमरेवर इंजेक्शन देवून गोळ्या लिहून दिल्या होत्या. दरम्यान, १४ ऑक्टोबरला दुर्वेशच्या कमरेवर इंजेक्शन दिल्याच्या ठिकाणी त्रास व्हायला लागल्याने कुटुंबियांनी डॉ. युवराज पाटील यांना संपर्क साधला पण, तो होवू शकला नाही म्हणून गावातील डॉ. सुभाष जाधव यांच्याकडे त्याला नेले. त्यांनी सुध्दा दुर्वेशला कमरेवर व हाताच्या दंडावर इंजेक्शन दिले व पुन्हा काही गोळ्या लिहून दिल्या.

उपचाराला जळगावात पाठविले अन् गँगरीन झाल्याचे समोर आले...
दरम्यान, दुर्वेशला कमरेवर इंजेक्शन घेतल्याच्या ठिकाणी त्रास होत असल्याने त्याच्या मामाने डॉ. युवराज पाटील यांना फोनवरुन सांगितले. डॉक्टरांनी त्याला घरी येवून तपासले. पुन्हा दवाखान्यात डॉ. स्वप्नील पाटील यांनी त्यास तपासून इंजेक्शन दिल्याच्या ठिकाणी सेप्टिक झाले असावे असे सांगत त्यास पुढील उपचारासाठी जळगावातील खासगी रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. १५ ऑक्टोंबर रोजी त्याला खाजसगी रूग्णालयात तपासल्यावर कमरेपासून ते मांडीपर्यंत गँगरीन झाले असून त्याची शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले व दुर्वेशच्या कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दिला. पण, शस्त्रक्रियेपूर्वी रक्ताचे सॅम्पल घेत असताना दुर्वेशची हालचाल अचानक थांबली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल...
या प्रकरणात दुर्वेश याचे सॅम्पल तपासणीसाठी नाशिक येथील न्याय वैद्यकीय प्रयोग शाळा येथे पाठविण्यात आले होते तर अकस्मात मृत्यूचे चौकशीचे पत्र हे अभिप्रायासाठी वैद्यकीय अधीक्षकांकडे सुध्दा पाठविण्यात आले होते. नुकताच त्यांच्याकडील अभिप्राय अहवाल प्राप्त झाला असून त्यात डॉ.स्वप्निल युवराज पाटील, युवराज गंगाराम ऊर्फ जयराम पाटील व डॉ सुभाष जाधव यांना इंजेक्शन देण्याची परवानगी नाही. तरी त्यांनी इंजेक्शन दिले. त्यांनी दिलेल्या इंजेक्शननाचे ठिाकणी गँगरीन होवून मृत्यू आलेला आहे, असे नमूद आहे. त्यामुळे अखेर दीड वर्षानंतर गुरूवारी दुर्वेश याच्या आई प्रतिभा पाथरवट यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दुर्वेश याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तिन्ही डॉक्टरांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करत आहेत.

Web Title: Shocking! Four injections were given to the waist in four days; Child's death due to gangrene, case against three doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.