धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 03:22 PM2024-11-27T15:22:35+5:302024-11-27T15:24:12+5:30
या केंद्रावर शून्य मते असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ती मते का मोजली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Vidhan Sabha Election ( Marathi News ) : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पाचोरा मतदारसंघात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. केंद्र क्रमांक २५८ची मतमोजणीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी या सर्वच बाबींबाबत संशय व्यक्त केला आहे. महायुतीचे आमदार किशोर पाटील यांनी ३८ हजार ६७८ मताधिक्य मिळवून हॅट्ट्रिक साधली आहे. मतदारसंघात ईव्हीएमवर आक्षेप घेत बूथवर कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांचे मतदान असताना बऱ्याच केंद्रावर त्यापेक्षाही कमी मते उमेदवारांना मिळाली आहेत, असा आक्षेप विरोधी उमेदवारांनी नोंदवला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी तसेच अपक्ष अमोल शिंदे यांच्यासह काही उमेदवारांनी हा आक्षेप घेतला आहे. केंद्र क्रमांक २५८वरील ईव्हीएम मशीनमधील मते मोजण्यातच आलेली नाही. या केंद्रावर शून्य मते असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ती मते का मोजली नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, "मतदान केंद्र क्र. २५८च्या बूथवरील ईव्हीएम मोजणी केलेली नाही. कारण केंद्रप्रमुखांनी १७-सी फॉर्मवर चुकीचे आकडे नमूद केले आहेत. आयोगाच्या नियमानुसार विजयी उमेदवारांच्या मतांचा जास्त फरक असल्याने तांत्रिक बाबीत अडकलेल्या या ईव्हीएम मोजणीची आवश्यकता नसल्याने मोजणी करण्यात आलेली नाही," असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांनी दिलं आहे.