धक्कादायक! घरातून २८ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास; तपासात जावईच निघाला चोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2024 03:54 PM2024-12-07T15:54:25+5:302024-12-07T15:55:25+5:30
घरात ठेवलेले ३३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये २ लाख ६० हजार रुपये असा एकूण २८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला होता.
भुसावळ : मेंदीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या परिवाराचे बंद घर फोडून चोरट्यांनी भरदिवसा २५ तोळे सोन्यासह २८ लाख ५५ हजारांचा ऐवज लांबवला होता. ही घटना सोमवारी दुपारी ३ ते रात्री १० च्या वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणात कुटुंबाचा जावईच चोर निघाला. त्याला फेकरी येथून मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले आहे.
राजेंद्र शरद झांबरे (रा. फेकरी, ता. भुसावळ, जि. जळगाव) असे या अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. २ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान अनिल हरी बहाटे (६४, रा. सोमनाथ नगर, शिवशक्ती कॉलनी, भुसावळ) यांच्या घराची मागील लोखंडी खिडकी चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले ३३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये २ लाख ६० हजार रुपये असा एकूण २८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला होता.
याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी गुन्हे शोध पथक तयार केले. या पथकाने केलेल्या तपासात बन्हाटे परिवाराचा जावई राजेंद्र झांबरे हा कर्जबाजारी असल्याचे समोर आले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेतले, त्याने चोरीची कबुली दिली आहे.
दोन पंचांसमक्ष मुद्देमाल जप्त
चोरीस गेलेल्या ऐवजापैकी २३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व इतर २१ लाख रुपयांचा मुद्देमाल त्याने काढून दिला. तो दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आलेला आहे.
दरम्यान, ही कारवाई निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेका. विजय नेरकर, नीलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, सोपान पाटील, प्रशांत परदेशी, भूषण चौधरी, राहुल वानखेडे, योगेश माळी, जावेद शहा या पथकाने कारवाई केली.