धक्कादायक...शेंदुर्णीत जन्मदात्रीनेच पोटच्या गोळयाला विकले दोन लाखांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 04:04 PM2017-12-15T16:04:45+5:302017-12-15T16:11:54+5:30
बाळ पळविल्याचा मातेकडूनच कांगवा : आईसह चार जणांना पहूर पोलिसांकडून अटक
मनोज जोशी
पहूर, जि.जळगाव, दि.१५ : आई म्हणजे आत्मा व परत्मामा यांचे एक रूप आहे. मात्र पैशांसाठी या पवित्र नात्याला सिल्लोड येथील एका मातेने काळीमा फासली. पोटच्या गोळयाला दोन लाखात विक्री करून बाळ पळविल्याचा कांगवाही या आईनेच केल्याचा धक्कादायक प्रकार पहूर पोलिसांनी उघड केला आहे. आईसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे तर एक जण फरार झाला आहे.
प्राप्त माहिती नुसार मनीलाल पटेल (रा.गुजरात) यांना अपत्य नसल्याने त्यांचा नातेवाईक रेखा राजूरी गोस्वामी (रा.जय भवानी नगर, सिल्लोड) यांच्याशी संपर्क झाला. या दरम्यान रेखा हिचे बाळ मनीलाल याला देण्यासाठी एप्रिल महिन्यात आपसात बोलणी झाली. त्यावेळी बाळ चार महिन्यांचे होते. या बदल्यात मनीलाल याने रेखाला दोन लाख रुपये देण्याचे ठरले. याला पल्लवी संजय पटेल, संजय भैय्या पटेल, (रा.रालेसना ता.विसनार जि.म्हैसाना गुजरात), व मिना मिलिंद सूर्यवंशी (रा.जय भवानी नगर सिल्लोड जि.औरंगाबाद) या नातेवाईकांनी सहमती दर्शविली. त्यानंतर मनीलाल बाळाला घेऊन त्यांच्या घरी आले.
महिलेने केला बाल न्यायालयात अर्ज
बाळाला दिल्यानंतर संशयित रेखा व काही महिलांमध्ये तू तू- मैं मैं झाली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस येण्याच्या भितीने रेखाने आपले बाळ पळून नेल्याचा तक्रारी अर्ज बाल न्यायालय औरंगाबाद यांच्याकडे केला. या अर्जानुसार सिल्लोड शहर पोलीस तसेच पहूरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, मनोहर पाटील यांनी या महिलेची चौकशी केली. ही महिला शेंदुर्णी येथे कामाला असताना तिने मनीलाल याला बाळाची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तब्बल आठ महिन्यानंतर गुन्हा दाखल
या प्रकरणातील आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे चौकशीअंती सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बजरंग धनसिंग कुरबरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आई रेखा, मनीलाल, मीना सूर्यवंशी, पल्लवी पटेल, संजय पटेल यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३७० (४), (१) बाल विक्री अधिनियम कायद्यांर्तगत पहूर पोलिसात गुरुवारी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आईसह चौघांना अटक केली आहे. तर मनीलाल बाळाला घेऊन फरार आहे.
संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
फरार असलेल्या मनीलाल याला ताब्यात घेतल्यावर या घटनेतील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अटकेतील संशयितांना पोलिसांनी जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.