करंजपाणी जंगलात वनविभागाच्या पथकावर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 09:46 PM2021-04-12T21:46:18+5:302021-04-12T21:47:10+5:30
वन प्राण्यांच्या शिकारीसाठी आलेल्या परप्रांतीयांनी वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार केल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यावल : यावल अभयरण्यातील करंजपाणी क्षेत्रात वन प्राण्यांच्या शिकारीसाठी आलेल्या परप्रांतीयांनी वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार केल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत टोळक्याविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यात येणाऱ्या करंजपाणी परिमंडल कक्ष ०३ क्रमांक १०४ मध्ये वनरक्षक विजय गोरख शिरसाठ ( २७) व त्यांचे सहकारी लेदा सिताराम पावरा, काळु बाळु पवार (लंगडाआंबा), अश्रफ मुराद तडवी , (करंजपाणी) हे रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास लंगडाआंबा भागात गस्त घालीत होते. त्याचवेळी तिथे १० ते १५ जणांचे एक टोळके फिरत होते. वन कर्मचारी दिसतात त्यांनी तिथून पळ काढला. वनविभागाच्या पथकाने या टोळक्याचा पाठलाग केला असता त्यांनी गोळीबाराच्या दोन फैरी झाडल्या.
यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जवळच असलेल्या झाडामागे लपून जीव वाचविला. मोबाईललाही रेंज़ नव्हती. शेवटी हे कर्मचारी शेणपाणी सरंक्षणकुटी येथे पोहचले. तिथून रेंजर अक्षय म्हात्रे यांना या घटनेची माहिती देण्यात आली.
यानंतर करंजपाणी येथील वनरक्षक विजय गोरख शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन यावल पोलिसात १० ते १५ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर शिकारीच्या उद्देशाने फिरणे, शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे या नमूद करण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व अंमलदार सुशिल घुगे, भुषण चव्हाण,असलम खान हे करीत आहे. अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे पथक करंजपाणी येथे रवाना झाले आहे.