शासन मान्यता असल्याचे भासवत संस्थेच्या माध्यमातून दुकानदारी
By विजय.सैतवाल | Published: February 24, 2024 11:52 PM2024-02-24T23:52:57+5:302024-02-24T23:53:43+5:30
शुल्क आकारून व शासनाचा लोगो वापरुन प्रशिक्षण संस्थांना दिले बनावट प्रमाणपत्र
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : राज्य शासनाच्या प्रशिक्षण मंडळाशी मिळते-जुळते नाव असलेली संस्था स्थापन करून विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रम चालवण्यासाठी शुल्क घेत व शासनाचा लोगो असलेले बनावट प्रमाणपत्र देत शासन तसेच उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या संस्थेची दुकानदारी तपासणीत समोर आली आहे. या प्रकरणी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ या संस्थेच्या धनंजय दिनकर कीर्तने (रा. त्र्यंबकनगर, महाबळ) याच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कीर्तने याला अटक करण्यात आली असून त्याला २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सन २०११मध्ये व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ अशा नावाची कीर्तने याने एनजीओ स्थापन केली. दुसरीकडे शासनाची ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ’ या नावाचे मंडळ आहे. या नावाशी मिळते-जुळते नाव संबंधित एनजीओचे असून ही खासगी संस्था असतानाही सरकारी अभ्याकक्रमासाठी परवानगी व प्रमाणपत्र देऊ शकतो, असे लहान-लहान प्रशिक्षण संस्थांना सांगितले. यामध्ये आमच्याकडे १३० अभ्यासक्रम असल्याचेही सांगून तशी परवानगी देऊ शकतो, असेही भासवले.
यात व्यवसाय शिक्षणाशी संबंधित विविध अभ्यासक्रम चालवण्यासाठी प्रशिक्षण संस्थांकडून शुल्क आकारत त्यांना मान्यता दिली. तसेच उमेदवारांना प्रशिक्षण घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र दिले. यात शासनाचा लोगो वापरून व शासकीय नावाचे बनावट प्रमाणपत्र छापून ते विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले. यात शासनाची, उमेदवारांची फसवणूक करण्यात आली.
हमी पत्र व दंडानंतरही बनवाबनवी सुरूच
हा प्रकार लक्षात आल्यानंतर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत २०२२मध्ये संबंधित संस्थेची तपासणी करण्यात आली. त्यावेळी संस्थेला दंड करण्यात आला व पुन्हा असा प्रकार होणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले. मात्र त्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याचे तपासणीत समोर आले.
या प्रकरणी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी संजयकुमार माधवराव पाटील (५७, रा. प्रतापनगर) यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ या संस्थेचे धनंजय दिनकर कीर्तने, सोनाली अमृत दहिभाते, अनिता धनंजय कीर्तने (सर्व रा. त्र्यंबकनगर) या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील करीत आहेत.
सोमवारपर्यंत कोठडी
या प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्यांपैकी धनंजय कीर्तने याला अटक करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवार, २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.