जळगावातील महिला बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात शॉपिंग मॉल : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 04:09 PM2018-02-07T16:09:43+5:302018-02-07T16:18:30+5:30
बहिणाबाई महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.७ : प्रत्येक महिलेला कुटुंब चालविण्यासाठी आपले योगदान असावे असे वाटत असते. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला घर चालविण्यासाठी मोलाचा वाटा उचलत आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रत्येक तालुक्याला शॉपिंग मॉल उभारण्याची शासनाची योजना असल्याचे महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले.
भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवाचे बुधवारी दुपारी १ वाजता सागर पार्कवर उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जि.प.सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, पीपल्स् बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
प्रत्येक तालुक्यात बचत गटांसाठी मॉलची निर्मिती
कोल्हापूर जिल्ह्यात महिला बचत गटांसाठी मोठ्या मॉलची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी शासनाची स्वतंत्र योजना आहे. जळगाव जिल्ह्यात देखील प्रत्येक तालुक्यात बचत गटांच्या माल विक्रीसाठी मॉल तयार करावे अशी सुचना आपण जिल्हाधिका-यांना करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध क्षेत्रातील दहा मान्यवरांना पुरस्कार वितरण
पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रासाठी चैत्राम पवार, गौरी सावंत, हेमा अमळकर, वासंती दिघे, शैक्षणिक क्षेत्रासाठी गोपाल चव्हाण, हर्षल विभांडिक, प्राचार्य डॉ.एस.एस.राणे, साहित्य क्षेत्रासाठी कवयित्री माया धुप्पड, क्रीडा क्षेत्रासाठी शीतल महाजन, सांस्कृतिक क्षेत्रासाठी शाहिर शिवाजी पाटील यांना बहिणाबाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.