महात्मा गांधी मार्केट मधील दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:14 AM2021-03-24T04:14:29+5:302021-03-24T04:14:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा प्रशासनाकडून गाळेधारकांनी केलेल्या आंदोलनाला केराची टोपली दाखवत अखेर गाळे सील करण्याच्या कारवाईला सुरुवात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा प्रशासनाकडून गाळेधारकांनी केलेल्या आंदोलनाला केराची टोपली दाखवत अखेर गाळे सील करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. मंगळवारी महात्मा फुले मार्केट मधील एक दुकान मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांनी सील केले आहे. महापालिकेचे पथक गांधी मार्केट मध्ये पोहोचल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. मनपाने गाळे सील करण्याची कारवाई सुरु केल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी लवकरात लवकर थकीत भाड्याची रक्कम भरली जाईल असे सांगितल्यानंतर महापालिकेने तूर्तास कारवाई थांबवली आहे.
महापालिका प्रशासनाने गेल्या महिन्यात महापालिकेच्या मार्केटमधील मुदत संपलेल्या गाळेधारकांना नोटिसा बजावून नुकसानभरपाईची रक्कम भरण्याची सूचना दिली होती. त्यानंतर गाळेधारकांनी मनपाच्या या निर्णयाविरोधात तीन दिवस संप पुकारला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गाळेधारकांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे महापालिका प्रशासनाने देखील कारवाई थांबवली होती. मात्र प्रशासनाने आता पुन्हा कारवाईस सुरुवात केली असून, गाळेधारकांना थकीत भाड्यासह नुकसान भरपाईची रक्कम देखील भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी सकाळी अकरा वाजता महापालिका उपायुक्त प्रशांत पाटील यांचा पथकाकडून महात्मा फुले मार्केटमधील गाळे सील करण्यात आले आहे.
वसुलीवर परिणाम झाल्याने महापालिका आक्रमक
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. अजून काही दिवस शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास गेल्या वर्षाप्रमाणे मालमत्ता कराची वसुली थकीत राहण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने इतर उत्पन्नातून वसुली करण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच मुदत संपलेल्या गाळेधारकांकडून काही रक्कम वसूल करण्यात यावी यासाठी मनपाने आता आक्रमकपणे गाळे सील करण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
गाळे धोरणाचा प्रस्ताव अजूनही पडूनच
महापालिकेच्या मार्केटमधील मुदत संपलेल्या गाळेधारकांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. तसेच हा प्रस्ताव महासभेत आणून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा यासाठी तयारी केली होती. मात्र तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाचा हा प्रस्ताव महासभेत आणला नाही. मात्र आता महापालिका प्रशासनाने या प्रस्तावावर निर्णय घेण्याच्या आधीच कारवाईला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन गाळेधारकांना दिले होते. मात्र याकडेही दुर्लक्ष करून मनपा प्रशासनाने नुकसान भरपाई थकवणाऱ्या गाळेधारकांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.