तब्बल ७४ दिवसानंतर आज उघडणार दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:43 AM2020-06-05T11:43:44+5:302020-06-05T11:44:00+5:30
एक दिवसाआड : हॉटेल, मद्य विक्री बंदच
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू शिथिलता दिली जात असली तरी ७४ दिवसानंतर दुकाने सुरू करताना सम-विषम पद्धतीने सुरू होणार असल्याने दुकानदारांना एक दिवसआड दुकाने उघडावी लागणार आहे. त्यात संकुलास परवानगी नाकारण्यात आली असून शहरातील बहुतांश दुकाने मात्र व्यापारी संकुलात असल्याने त्यांच्यापुढे व्यवसायाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात हॉटेल, मद्य विक्रीला परवानगी नसल्याने हे व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान दुकाने उघडी असतील.
इतर व्यवसायिकही चिंतेत
५ जूनपासून काही दुकाने सुरू होणार असली तरी ती पी-१ व पी-२ अर्थात सम विषम पद्धतीने सुरू करण्याचे राज्य शासनाच्या आदेशात म्हटले आहे. प्रशासनाने आदेश काढताना राज्य सरकारच्या आदेश क्रमांकाचा उल्लेख करीत ते लागू राहतील असे म्हटले आहे. त्यामुळे सर्वच व्यावसायिकांना दररोज दुकान उघडता येणार नाहीत. परिणामी शहरातील एका बाजूची दुकाने ५ जून रोजी उघडल्यास ६ रोजी ते बंद राहतील व त्या दिवशी त्याच्या विरुद्ध बाजूचे दुकान सुरू राहतील. दोन महिन्यांनंतरही काही दुकाने बंदच राहणार असल्याने व्यापार संकटात सापडला असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
जळगावबाबत दुजाभाव
अनलॉक-१ मध्ये व्यवहार सुरू होत असले तरी जळगावातील इतर व्यवहाराबाबत इतर शहरांच्या तुलनेत दुजाभाव होत असल्याचा आरोप केला जात आहे. जळगावपेक्षा मोठ्या महापालिका व जेथे जळगावपेक्षा जास्त रुग्ण संख्या आहे, तेथे मद्य विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जळगावात ही परवानगी मिळत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. नाशिक, नांदेडसह इतर मनपा क्षेत्रात ही परवानगी देण्यात आली असून जळगावतही परवानगी मिळण्याची मागणी केली जात आहे. या सोबतच हॉटेल सुरू करण्याबाबतही निर्णय होत नसल्याने हे व्यावसायिकही चिंतेत आहेत.