दारूबंदीसाठी अल्प मतदान
By admin | Published: March 20, 2017 12:47 AM2017-03-20T00:47:39+5:302017-03-20T00:47:39+5:30
वढोदा : अवघ्या 45़38 टक्के महिलांचा सहभाग
मुक्ताईनगर : तालुक्यातील वढोदा येथे दारूबंदीसाठी महिलांनी पुढाकार घेतला होता. यासाठी 19 रोजी घेण्यात आलेल्या मतदानात गावातील फक्त 45.38 टक्के महिलांनी सहभाग घेतला. अपेक्षित मतदान न झाल्याने दारूची बाटली आडवी पाडण्यात महिलांना अपयश आले आहे.
वढोदा येथे दारूबंदीसाठी 23 ऑक्टोबर 2016 रोजी महिलांची विशेष ग्रामसभा आयोजित करून एक हजार 245 महिलांनी दारूबंदीचा ठराव पारित केला होता आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवाना असलेले दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़ अगदी बॅण्ड लावून देशभक्तीपर गीतांच्या तालावर दारूबंदीसाठी जनजागृती येथे करण्यात आली होती. उत्पादन शुल्क विभागाने निवेदनावरील सह्यांची पडताळणी केली होती. त्या वेळी याच महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला होता. त्या वेळी एक हजार 245 महिला अर्थात 57.59 टक्के महिलांचे दारूबंदीला समर्थन असल्याचे प्रत्यक्ष स्वाक्षरी पडताळणीत सिद्ध झाले होते. तसा अहवाल जिल्हाधिका:यांना सादर ही करण्यात आला. यावर वढोदा येथे दारूबंदीसाठी मतदान घेण्याचे आदेश जिल्हाधिका:यांनी काढले.
19 मार्च रोजी झालेल्या मतदानात मतदार यादीतील 2238 मतदानापैकी आडव्या बाटलीला 858, दारू सुरू ठेवण्यास उभ्या बाटलीवर 74 तर 83 मते अवैध पडली.
रविवारी सकाळी आठ ते दुपारी दोन दरम्यान येथे मतदान झाले. चार वाजता मतमोजणी पार पडली. तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी सांगितले की, मतमोजणी अहवाल जिल्हाधिका:यांकडे पाठविला जाईल त्यानंतरच येथे दारू दुकान सुरू की बंद ठेवावे हा निर्णय येईल. दरम्यान, दारूबंदीसाठी आवश्यक मतदान झाले नाही. 52 टक्क्यांच्या आत झालेले मतदान पाहता येथे महिला हरल्याचे व बाटली जिंकल्याचे चित्र आहे.