लस उत्सवाला तुटवड्याची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:38+5:302021-04-13T04:14:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाजपने लस उत्सव सुरू केला असला, तरी लस उपलब्ध होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाजपने लस उत्सव सुरू केला असला, तरी लस उपलब्ध होत नसल्याने त्यात अडचणी येत आहेत. या मोहिमेसाठी लसीची प्रतीक्षा असून, कोरोना उपाययोजनांसाठी भाजपकडून जनजागृती केली जात आहे.
दिनांक ११ ते १४ एप्रिल असे चार दिवस भाजपतर्फे लस उत्सव सुरू करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येकाने लसीकरण करावे, सुरक्षित राहावे आणि स्वतःचा बचाव करावा यासाठी आवाहन करत लसीकरणाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. भाजपने तशी जनजागृती सुरू केली आहे, मात्र जळगाव जिल्ह्यात लस उपलब्ध होत नसल्याने प्रत्यक्ष लसीकरणात अडचणी येत आहेत.
याशिवाय भाजपने कोरोना उपचारादरम्यान येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी समितीची स्थापना केली असून, या समितीकडूनही मार्गदर्शन केले जात आहे. त्यात खाटा उपलब्ध करून देणे, इंजेक्शनचा तुटवडा असल्याने त्याविषयीची माहिती देणे, औषधोपचार व इतर अडचणी सोडविण्यासाठी भाजप जनजागृती करत आहे.
जळगावातील नऊ मंडळांमध्ये समितीमार्फत हा उत्सव साजरा केला जाणार आहे. मात्र, लस मिळत नसल्याने अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या नियोजनाअभावी लस पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे. केंद्राकडून राज्याला पुरेसा लस पुरवठा होत आहे, मात्र खोटे आरोप करून राजकारण केले जात असल्याचेही आमदार भोळे म्हणाले. त्यामुळे अशा गंभीर परिस्थितीत राज्य सरकारने राजकारण न करता, जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.