आईने शाळेत सोडल्यानंतर काही क्षणांत विद्यार्थिनीचा चक्कर येऊन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:13 AM2020-12-29T04:13:55+5:302020-12-29T04:13:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वर्गात जाण्यासाठी जिना चढत असताना अचानक चक्कर येऊन पडल्याने मिधहत फातेमा नईम शेख (१७, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वर्गात जाण्यासाठी जिना चढत असताना अचानक चक्कर येऊन पडल्याने मिधहत फातेमा नईम शेख (१७, रा.शाहुनगर) या अकरावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना ॲग्लो उर्दू हायस्कूलमध्ये सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.
मिधहत फातेमा नईम शेख ही शहरातील हाजी नूर मोहंम्मद चाचा उर्दू हायस्कूलमध्ये अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. सोमवारी सकाळी तिला आईने शाळेत दुचाकीने सोडले. त्यानंतर मिधहत फातेमा ही वर्गात जाण्यासाठी जिना चढत असताना अचानक तिला चक्कर आली. क्षणातच ती खाली पडली. यात ती गंभीर जखमी झाल्यानंतर लागलीच तिला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, मिधहत हिची प्रकृती चितांजनक झाल्याने लागलीच जिल्हा शासकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तिला तपासणीअंति मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
बहिणीचा सुद्धा चक्कर येऊन मृत्यू
दहा वर्षांपूर्वी मिधहत फातेमा हिची मोठी बहीण बिरजीस फातेमा हिचादेखील बिग बाजार येथे जिना चढताना याच पद्धतीने चक्कर येऊन पडून मृत्यू झाला होता. दोन्ही बहिणींनी एकाच शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यांची आईदेखील याच शाळेत शिकलेल्या आहेत. वडील नईम शेख हे रिक्षाचालक असून, रिक्षा चालवून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. मयत मिधहत हिच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.