जळगावातील पाच नगरसेवकांना अपात्रतेबाबत कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 09:27 PM2019-12-03T21:27:43+5:302019-12-03T21:30:47+5:30
१७ डिसेंबर रोजी सर्व नगरसेवकांना सुनावणीसाठी मनपात हजर राहण्याचेही आदेश
जळगाव - घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या विद्यमान पाच नगरसेवकांना अपात्र का करण्यात येवू , हा जाब विचारत मनपाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी मंगळवारी नोटीस बजावली असून, १७ डिसेंबर रोजी सर्व नगरसेवकांना सुनावणीसाठी मनपात हजर राहण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
घरकुल घोटाळ्यात आजी-माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसह ४८ जणांना धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये नगरसेवक भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी, लता भोईटे, कैलास सोनवणे यांचा समावेश आहे. घरकुल घोटाळ्यात शिक्षा सुनावल्यानंतर मनपाने संबधित नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत विधी तज्ज्ञांकडून सल्ला मागितला होता. त्यानुसार विधी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार अपात्र होण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, याबाबत नगरसेवकांची बाजू देखील समोर यावी या उद्देशाने नगरसेवकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मनपाने दिली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी मंत्रायलयात राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडे देखील तक्रार केली असून, पाचही नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.