जळगावच्या जैन हिल्सवर साकारलंय ‘श्रद्धाधाम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:59 AM2019-06-05T02:59:53+5:302019-06-05T02:59:59+5:30
पर्यावरणीय जैवसाखळीला पूर्णत्व देणारे चैतन्यशिल्प
जळगाव : हिरवळीने नटलेल्या जळगावच्या जैन हिल्सच्या परिसरात साकारण्यात आलेल्या ‘श्रद्धाधाम’ येथे तब्बल २५० वर वृक्षराजी बहरली आहे. या ठिकाणी लता, वेली, वृक्ष आणि असंख्य फुलझाडं आहेत जी मनाला उभारी देत असतात. ‘श्रध्दाधाम’ हे पर्यावरणीय जैवसाखळीला पूर्णत्व देणारे जणू चैतन्यशिल्प बनले आहे.
पूर्वी हे ठिकाण ‘भाऊंचा धक्का’ या नावाने ओळखले जात होते. आता त्याचे ‘श्रद्धाधाम’ असे भावनिक नामकरण करण्यात आले आहे. जैन हिल्स परिसरातील पावसाचे वाहून जाणारे पाणी नियोजपूर्वक अडवून ते जमिनीत झिरपावे, यासाठी सन १९९१ च्या सुमारास पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्यादृष्टीने उचलेले हे महत्वपूर्ण पाऊल होते. जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलालजी जैन हे नेहमी या परिसरात येत असत. या परिसरात शोभिवंत झाडाबरोबरच सुगंधीत फुलांच्या वेली देखील आहेत. ज्यामुळे अगदी भर उन्हाळ्यात देखील या परिसराचा फेरफटका मारला तरी येथील वातावरणामुळे मनाला शांतता लाभते. तलावाच्या मध्यभागी असलेले भवरलालजी आणि आई कांताईचे प्रेरणादायी शिल्प आणि कारंजे जीवनातील चैतन्यतत्त्वाला स्पर्श करीत असतात. श्रध्दाधाम हे पर्यावरणीय जैवसाखळीला पूर्णत्व देणारे जणू चैतन्यशिल्प बनले आहे.
आम्हा कुटुंबियांची तीर्थरुप भाऊ आणि बाई यांच्यावर श्रद्धा आहे. त्यांनी आम्हाला संस्कारासोबत आदर्श जीवनमूल्यांचा वारसाही दिला. म्हणूनच या जागेचे श्रद्धाधाम नामकरण करण्यात आले. ‘सार्थक करूया जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे’ असे आम्ही नेहमी म्हणत असतो.
- अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव.