जळगावात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या श्रावण गीतांनी रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 08:53 PM2018-08-28T20:53:59+5:302018-08-28T20:58:49+5:30
हसरा नाचरा श्रावण आला, श्रावण मासी हर्ष मानसी, पाऊसधारा गाणी गाती, झिमझिम पाऊस लाडाचा, नभाचा गडगडाटी इशारा, आकाशी पोटली, सप्तरंगाच्या नभी आकाशी...असे एकाहून एक सरस श्रावण गीते सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
जळगाव : हसरा नाचरा श्रावण आला, श्रावण मासी हर्ष मानसी, पाऊसधारा गाणी गाती, झिमझिम पाऊस लाडाचा, नभाचा गडगडाटी इशारा, आकाशी पोटली, सप्तरंगाच्या नभी आकाशी...असे एकाहून एक सरस श्रावण गीते सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी संध्याकाळी कांताई सभागृहात ‘रंग बावरा श्रावण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, सचिव राजेंद्र नन्नवरे उपस्थित होते.
यावेळी प्रतिष्ठानच्या डॉ.अविनाश आचार्य विद्यालय, ब.गो. शानभाग विद्यालय, श्रवण विकास कर्णबधिर विद्यालय, विवेकानंद इंग्लिश स्कूल व पलोड पब्लिक स्कूलच्या तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमात सादर काही गाणी ही शिक्षकांनी स्व-रचित व संगीतबद्ध केली होती. यात स्वाती बेंद्रे लिखित ‘पावसाची गंम्मत’ या गीतास विजय पाटील यांनी संगीतबद्ध केले. गीतकार मिलिंद देशमुख लिखित ‘नभाचा गडगडाटी इशारा’ या गीताला स्वाती देशमुख यांनी संगीतबद्ध केले. शुभदा नेवे यांनी ‘पाऊस धारा गाणे गाती झिम्मड’ यास स्वत: संगीतबद्ध केले. रवींद्र भोयटे लिखित ‘सप्तरंगांच्यानभी आकाशी’यास स्वाती देशमुख यांनी संगीतबद्ध केले.