जळगाव जिल्ह्यात आनंद संप्रदायाचा प्रभाव आढळतो. भागवत धर्माच्या आद्य प्रवर्तकांमध्ये आनंद संप्रदायाचे महत्त्वाचे योगदान आहे. संप्रदायाचे स्वरूप विशाल आणि सर्वसमावेशक आहे. योगविद्यासंपन्न अशा या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक साक्षात् श्री गुरू दत्तात्रेय असल्याची एक मान्यता आहे. समन्वयकारी मानव्याची उपासना यातून होत असल्यामुळे श्री शिवराम स्वामी म्हणतात की, ‘ऐसा या प्रतीचा महार जर हो, तो आमुचा सद्गुरू’ या संप्रदायाचा प्रकाशस्तंभ मुकुंदराज कवीचा ‘विवेकसिंधु’ ग्रंथ मानता येईल. आनंद संप्रदायाचे तत्त्वज्ञान हे अद्वैतपर आहे. या संत संप्रदायाला एक अतिशय सुंदर अशी भावमधूर परंपरा लाभली आहे. ही परंपरा पूर्णानंद आनंद संप्रदायाशी संलगA अशी आहे. सातारा, गोवा, कोल्हापूर या भागातूनही आनंद संप्रदायाचा प्रभाव आणि विचार दिसून येतो. संत एकनाथांचे पणतू श्री शिवरामस्वामी कल्याणीकर व त्यांचे पुत्र वैकुंठ स्वामी, बंधू अनंतस्वामी या संप्रदायातच दीक्षित होते. डॉ. भीमाशंकर देशपांडे यांनी आनंद संप्रदायावर अधिकारपूर्वक केलेले लेखन हिंदी व मराठीतून उपलब्ध आहे.
र.पु.वर्डीकर यांनी दिलेली आनंद संप्रदायाची शिष्य परंपरा डॉ.भीमाशंकर देशपांडे यांनी दिलेल्या यादीपेक्षा भिन्न आहे. या परंपरेतले हे महादेव भट्ट उपासनी माध्यंदिन शाखेचे वत्सगोत्री पंचप्रवरी ब्राrाण अतिशय कर्मठ, व्रतस्थ आणि धर्मनिष्ठ होते. यांना दोन मुले होती. थोरला गमा उपाख्य गणपती तर धाकटा पमा उपाख्य परमानंद होय. महादेव भट्टांनी उतार वयात चतुर्थ आश्रम स्वीकारून प्रयाग येथे त्रिवेणी संगमात देह विसजिर्त करून जलसमाधी घेतली. गणपती हे थोर विद्वान असून पित्याप्रमाणेच चतुर्थाश्रम घेऊन त्यांनी धरणगाव येथे समाधी घेतली. पित्याने त्यांना धरणगाव न सोडण्याची आज्ञा दिली असल्यामुळे त्यांना प्रयाग क्षेत्री जाता आले नाही.
गणपतीचा मुलगा मधुसूदन. मधुसूदनचा मुलगा चिंतामणी. हा अतिशय विद्वान आणि ग्रंथकार होता. या चिंतामणीचा मुलगा म्हणजेच खानदेशातले या पंथाचे सत्पुरुष सदाशिव उपाख्य सदानंद स्वामी होत. यांचा जन्मकाळ शके 1585 किंवा 1587 मानता येईल. हे बालपणापासून बालोन्मत्त स्थितीत असत. यथावकाश त्यांचा व्रतबंध संस्कार संपन्न झाला. तीव्र बुद्धिमत्ता असल्यामुळे ब्राrाण ग्रंथ, श्रौत, काव्यालंकार, न्याय यासारख्या विषयात ते पारंगत झाले. या काळात त्यांनी रामेश्वर येथे म्हणजे तापी-गिरणा संगमावर अनुष्ठान करून बरेचसे ग्रंथ लेखन केले. धरणगावी मुक्काम करून पित्याच्या आ™ोवरून त्यांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. त्यांना दत्तात्रेयाचा साक्षात्कार झाला असल्यामुळे ते पुढे माहूर गडावर गेले. उग्र तपाचरण केले. प्रसाद चिन्ह म्हणून पादुका मिळवल्यात. त्यांना अशी आज्ञा झाली. ‘या जन्मी मी कलियुगात शहादत्त आलम प्रभू या नावाने अवतार घेऊन भक्तांचा उद्धार करतो आहे. या भक्तांपैकी माङो परमभक्त असलेले श्री मत्परमहंस आत्माराम स्वामी यांच्याकडे जाऊन त्यांचा उपदेश ग्रहण कर’. सदाशिव धर्माधिकारी सद्गुरूंचा उपदेश ग्रहण करण्यासाठी सिद्धापुरास आले. आपल्या या भेटीच्या प्रसंगाचे वर्णन त्यांनी पद्यरूपाने लिहिलेल्या आत्माराम स्वामींच्या चरित्र ग्रंथात येते. त्यांचा अनुग्रह प्राप्त झाल्यावर ते कृतार्थ झाले. एवढय़ाने त्यांचे समाधान न झाल्यामुळे आपल्या गुरूंना सोबत घेऊन ते धरणगावी आले. तेथे धांगोबा गणपतीचे स्थान आहे. त्या ठिकाणी वास करून ते राहिलेत. परिसरात आता त्यांना जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज या रूपातच जनलोक न्याहाळत असत. आत्माराम स्वामी आणि सदानंद स्वामी यांचा आनंद ब्रrाोति या उपनिषद वाक्यांवर प्राकृत भाषेत सुमारे 1500 ओव्यांचा संवादात्मक संवादपर असा ग्रंथ आहे. तैत्तिरीय उपनिषदात आनंद ब्रrोति या शब्दसमुच्चयाने सुरू होणारा एक भाग आहे. हे उपनिषद कृष्ण यजुव्रेदीय तैत्तिरीय शाखेच्या अंतर्गत असलेल्या आरण्यकाचा भाग आहे. या आरण्यकाचे दहा अध्याय असून सात ते दहा अध्याय तैत्तिरीय उपनिषद या नावाने ओळखले जातात. या वचनांचा अर्थ असा आहे की आनंद हेच ब्रrा आहे, कारण ही सर्व भूते आनंदातूनच जन्माला येतात. जन्माला आल्यावर आनंदामुळेच जीवन यापन करतात आणि अखेरीस या लोकातून प्रयाण करताना आनंदातच विलीन होतात. या आनंदमय परमेश्वराचीच उपासना करावी. उपनिषदातील या विद्येलाच भार्गवी वा वारुणी विद्या असे म्हणतात. या ग्रंथात ‘सदाशिव विप्र वेडा’ अशी आपली नाममुद्रा त्यांनी रेखली आहे. आत्माराम स्वामींचे शिवानंद गिरी, सदानंद गिरी, असे आणखी काही शिष्य प्रख्यात आहेत. शिवानंद गिरी यांचा मठ मोगलाईत असून त्यांची शिष्य परंपरा फार मोठी आणि तेजस्वी आहे. या मठात आजही आनंद संप्रदायाच्या धारणेनुसार कार्यक्रम सुरू असतात. ऐतिहासिक परंपरेत आनंद संप्रदायाचा हा ध्वज विशिष्ट असा आहे.
- प्रा.डॉ.विश्वास पाटील
Web Title: Shri Anand Sect and Khandesh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.