श्री बालाजी रथोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 07:12 PM2019-10-09T19:12:32+5:302019-10-09T19:13:08+5:30
चोपडा : रथोत्सवासोबतच दुर्गा विसर्जनाची जुनी परंपरा
चोपडा : येथील सुमारे ४५० पेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या वहनोत्सवात बुधवारी अश्वीन शुध्द एकादशीला श्री बालाजी महाराजांचा रथ दुपारी काढण्यात आला. रथोत्सवात जमलेल्या भाविक जनसमुदायाने ‘बालाजी महाराज की जय’च्या उद्घोषात रथ ओढण्यास प्रारंभ केला.
दुपारी १ वाजता रथाची पूजा-अर्चा करुन रथोत्सवास प्ररंभ झाला. रथ ओढण्यासाठी पूजेचे मानकरी पाटील गढीमधील रहिवासी संग्राम जितेंद्र देशमुख, विक्रम राजेंद्र देशमुख यांनी सपत्नीक पूजन केले. त्यानंतर मानकरी म्हणून नगराध्यक्षा मनीषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी, माजी आमदार जगदीश वळवी, माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, नगरसेवक भूपेंद्र गुजराथी, शेतकी संघ चेअरमन चंद्रशेखर पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र पंजे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गोरखतात्या पाटील, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, प्रविणभाई गुजराथी, फौजदार रामेश्वर तुरणर, मंडळाधिकारी अमृतराव वाघ, बांधकाम अभियंता गवांदे, जगदीश लाड यांना श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचे अध्यक्ष व्ही.सी. गुजराथी यांच्या हस्ते मानाचे नारळ देण्यात आले. त्यानंतर या सर्वांनी दोर ओढून रथ मिरवणूक यात्रा दुपारी १.२० वाजता सुरू केली.
प्रारंभी रथासाठी परंपरागत पूजेचे मानकरी विक्रम राजेंद्र देशमुख, जितेंद्र वाघ यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन पुरोहित सुनिल नाईक यांनी श्री बालाजींची चांदीची चल मूर्ती रथारूढ केली. त्यावेळी श्री बालाजींचा प्रचंड जयघोष सुरु होता. ढोलताशांच्या निनादात रथाचे मार्गक्रमण झाले. रथ बालाजी संस्थान पासून आशा टॉकीज, रत्नावती नदी, समांतर रोड, पाटील दरवाजामार्गे सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत गजबजलेल्या शिवाजी चौकात आणला जाऊन याच जागेवर रथ रात्रभर थांबविला जातो. दुस-या दिवशी सकाळी नऊ वाजता रथ पुन्हा ओढून मेन रोडमार्गे घरापर्यंत नेला जातो. अशा प्रकारे येथील रथोत्सव दोन दिवस चालतो. तालुक्यातील भाविक रात्री यात्रा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करतात.
यावेळी प्रा.आशिष गुजराथी, हरिष गुजराथी, मनिष गुजराथी, गिरिष गुजराथी, संजय सोमाणी, प्रवीण गुजराथी, किरण गुजराथी, मुरली गुजराथी आदी उपस्थित होते.
दुर्गा विसर्जन शांततेत
चोपडा : शहरात एकादशीलाच रथोत्सवासोबतच दुर्गा विसर्जनाची जुनी परंपरा आहे. शहरातील एकूण २२ सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांनी नोंदणी केली होती. बुधवारी दुपारपासूनच दुर्गा विसर्जनाला प्रारंभ झाला. गरबा, दांडिया व लेझीम खेळत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्री दुर्गा मातेला भावपूर्ण निरोप दिला. विविध मंडळांच्या वतीने ट्रक्टरवर आकर्षक सजावट केली होती.