जळगावातील श्री इच्छापूर्ती गणपतीचे दर्शन घेऊन आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेस सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 01:03 PM2019-07-18T13:03:54+5:302019-07-18T13:09:23+5:30
मंदिरात शिवसैनिकांची मोठी गर्दी
जळगाव : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जळगावातील विसनजीनगर परिसरातील श्री इच्छापूर्ती गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या राज्यव्यापी जन आशीर्वाद यात्रेला गुरुवारपासून सुरुवात केली. या वेळी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथराव शिंदे तसेच पर्यावरण मंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांच्या ‘जन आशिर्वाद यात्रे’ला गुरुवारपासून जळगाव जिल्ह्यातून सुरुवात झाली. या यात्रेसाठी त्यांचे सकाळी ११.३० वा. जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे, रामदास कदम, गुलाबराव पाटील, संजय राऊत, जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ यांनी ठाकरे यांचे स्वागत केले.
विमानतळावरून ठाकरे हे विसनजीनगर परिसरातील श्री इच्छापूर्ती गणपती मंदिरात पोहचले. तेथे त्यांच्याहस्ते आरती करण्यात आली व गणरायाचे दर्शन घेऊन जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. जळगावातून ठाकरे यांचे पाचोराकडे प्रयाण झाले. पाचोरासह आदित्य ठाकरे हे भडगाव, कासोदा, एरंडोल, धरणगाव, चोपडा, अमळनेर आणि पारोळा येथे भेटी देणार आहेत. त्यानंतर ते धुळ््याकडे रवाना होतील.