श्री पद्मनाभ सरस्वती उपाख्य श्री नारायणबुवा रुद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 04:46 PM2017-09-03T16:46:48+5:302017-09-03T16:47:07+5:30
खान्देशातील संतांची मांदियाळी -प्रा.डॉ. विश्वास पाटील धुळे येथे श्री पद्मनाभ सरस्वती उपाख्य श्री नारायणबुवा रुद्र यांच्या पुनीत वास्तव्याने भक्तीचा मळा फुलला. त्यांचे चरित्र धुळ्याच्या जो.रा.सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक ज.रा.वाणी यांनी लिहिले आहे. यापूर्वी यशवंत गणेश पुरंदरे यांनी शके 1830 म्हणजे सन-1909 साली महाराजांचे एक छोटे चरित्र लिहून प्रकाशित केले आहे.
श्री सखाराम अप्पाजी पुरंदरे यांच्या मंदिरात कारभारी मोरो सखाराम उपाख्य भाऊसाहेब यांच्यानंतर त्यांच्या प}ी वेणुताईंनी कारभार सांभाळला. त्या तीर्थयात्रेनिमित्त नाशिक येथे गेल्या असता त्यांच्या कानी श्री नारायण बुवा रुद्र यांची ख्याती आली. त्यांच्या विनंतीवरून नारायण बुवा धुळे येथे आले. श्री रामाचे एकनिष्ठ पुजारी म्हणून त्यांचे तीन तप वास्तव्य धुळे येथील श्रीराम मंदिरात होते. याच श्रीराम मंदिरात त्यांना आळंदीच्या स्वामींचा अनुग्रह झाला. ते पूर्ण ज्ञानी आणि योगी बनले. रुद्र हे देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण होते. बालपणी अंगी मुरलेल्या विरक्त वृत्ती आणि ईशपरायणतेमुळे स्वामींचे चरित्र वैशिष्टय़पूर्ण ठरते. मातृभक्त नारायणाचा गळा गोड होता. तत्कालीन सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री त्र्यंबकबुवा नाशिककर यांच्या चरणी बसून त्यांनी संगीतोपासना केली. श्री.लखुनाना पटवर्धन यांनी हे विद्यादान पूर्णत्त्वास आणले. काही काळ भुसार मालाचे दुकान चालवून उदरनिर्वाह केला. गवई म्हणून विदर्भ आणि खानदेशात भ्रमण केले. कारंजे ग्रामी श्री सद्गुरू नृसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन घेतले. धुळे मुक्कामी रुद्र महाराजांनी श्री रंगाशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यासाला आरंभ केला. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या आशीर्वादाने योगविद्या पूर्णत्वास पोहोचली होती. त्यांना पूर्ण ब्रह्यस्थितीचा साक्षात्कार झाला. ‘तत्त्वमसि’चा बोध करून घेऊन ते आत्मस्वरूपी स्थिर झाले. दत्ताेपासनेचा आदेश स्वीकारला. पुढेही दोन-तीन वेळा येऊन स्वामी महाराजांनी बुवासाहेब रुद्रांची कसोटी घेतली. ‘नारायण माङो हृदय आहे,’ असा सार्थ गौरव केला. विदर्भ आणि खानदेशातून अनुग्रहासाठी भक्त आले होते. स्वामींनी बुवांना नित्य पूजनासाठी काष्ठ पादुका दिल्या होत्या. डोईस बांधण्यासाठी एक भगवी छाटी प्रसाद म्हणून दिली होती. आपल्या निष्ठेमुळे आणि एकाग्र भक्तीमुळे बुवामहाराजांवर स्वामींची पूर्ण कृपा झाली. ते जीवन्मुक्त झाले. लोकसंग्रहासाठी पूर्ण ज्ञानी आणि योगी असूनही सगुणोपासक बुवांची नित्यपूजा अखंडपणे सुरू राहिली. कर्मधर्मसंयोगाने श्री भाऊसाहेब गणपुले मामलेदारांनी एक दत्तमंदिर उभे केले. ते बुवासाहेबांचे गुरुबंधू होते. त्यांनी स्वामी प्रेरणेने बुवांना आग्रह केला. बुवासाहेब धुळे येथे परतले. भक्ती आणि योगविद्येचा प्रचार-प्रसार करणारे सत्वसंपन्न नारायणबुवा महाराज आले. पुनश्च वसले. भक्तीगंगेचा प्रवाह खळाळता राखला. श्री बुवा महाराज आणि त्यांच्या गुरूपरंपरेचा तपशीलवार अभ्यास पुढे अनेकांनी केला. श्री बाबा पाळेकर यांनी ‘आळंदीचे स्वामी’ या नावाने 1693 साली चरित्र लिहिले. डॉ. दि.का. गर्दे यांनी ‘श्री सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या काही पत्रातील उतारे’ या शीर्षकाचा ग्रंथ प्रकाशित केला. श्री श्रीपाद बुवांनी ‘श्री सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या आठवणी’ संपादित करून प्रसिद्ध केल्यात. डॉ.रा.चिं.ढेरे यांचा ‘श्री नृसिंह सरस्वती : चरित्र आणि परंपरा’ हा संशोधन मूल्य असलेला ग्रंथ विद्वजनांची मान्यता पावला आहे. त्यांची स्वत:ची अशी काही ग्रंथसंपदा नाही पण त्यांचे जीवन, अद्भुत कार्य आणि योगसाधना हे ग्रंथाचे विषय आहेत. एका अभिनव प्रकारे ‘सगुणार्चनी निगरुण प्राप्ती’ असा जीवनध्यास बाळगून त्यांनी मोक्षमार्गाची वाटचाल सुलभ केली. स्वामींनी दत्ताेपासना तर उपासनेतच दिली होती. बुवा महाराजांनी कधी पंक्तिप्रपंच केला नाही. उच्चनीच भेदभाव पाळला नाही. ‘अन्नदान हे भक्तीचे वर्म’ हे त्यांचे ब्रीद होते. श्री बुवा महाराज आणि त्यांच्या गुरूपरंपरेचा तपशीलवार अभ्यास पुढे अनेकांनी केला. श्री बुवा महाराजांचे पद्ममय चरित्र धुळे येथील जो.रा.सिटी हायस्कूलमधील सेवानिवृत्त नामांकित शिक्षक मा.मा. उपाख्य काकासाहेब पाठक यांनी ओघवत्या शैलीत प्रसाद गुणांनी युक्त रसाळ ओव्यांच्या माध्यमातून रचले आहे. चरित्र ग्रंथांच्या आरंभी म्हटले आहे. श्री गणेशाय नम:। श्री सरस्वत्यै नम:। श्री सद्गुरूभ्यो नम:। ओम नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा। लंबोदरा तू ज्ञानदाता। सकल सिद्धी तुङया हाता। तुझी कृपा होता। उणे काय मजलागी।। श्री वाणी आणि श्री पुरंदरे यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या आधारे आपण ग्रंथरचना करत असल्याचा सुस्पष्ट निर्वाळा श्री.पाठक देतात. ग्रंथाची ओवीसंख्या 500 आहे. श्री बुवा महाराजांनी संन्यास दीक्षा घेतली. त्यांचे चतुर्थाश्रमातील नामाभिधान पद्मनाभ सरस्वती असे होते. त्यांनी 1902 साली समाधी घेतली. सोनगीरच्या वैभवशाली अध्यात्मिक परंपरेसोबत धुळे शहराचे नाव येते. धुळे हे अनेक अर्थानी धर्म आणि संस्कृती, साहित्य आणि इतिहास, सेवा आणि देशभक्ती अशा गुणांनी सुशोभित आहे. धुळे येथे ज्ञानाच्या परंपरेसोबत भक्तीचा मळा खुलला. बाहेरूनसुद्धा अनेक लोकांनी येऊन धुळे शहराला आपल्या सेवेने लाभ दिलेला आहे.