गुरुंच्या संस्कार शिदोरीनेच गाठला यशाचा टप्पा - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:39 PM2019-09-05T13:39:36+5:302019-09-05T13:39:59+5:30
शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणारे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आयुष्याला आकार देणारे कोण आहेत ते गुरु ?
जळगाव : मातृदेव, पितृदेवसोबतच ‘गुरुदेव’लादेखील प्रत्येकाच्या आयुष्यात सारखेच महत्त्व असते. त्यानुसार माझ्याही आयुष्यात आई-वडील या पहिल्या गुरुंप्रमाणे मला घडविणाऱ्या गुरुंनाही अनन्य महत्त्व आहे. शाळा, महाविद्यालयात संस्कारक्षम शिक्षक मिळाल्यास आदर्श विद्यार्थी घडतात आणि जे मुले शिक्षकांचे ऐकूण अभ्यास करतात, ते हमखास यशस्वी होतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यातीलच उदाहरण म्हणजे मी सुद्धा आहे. माझ्या गुरुंकडून मिळालेल्या संस्काराच्या शिदोरीनेच मी यशाचा टप्पा गाठू शकलो, असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षक दिनानिमित्त सांगत आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
अहमदनगर जिल्ह्यातील जवळवाडी, ता. पाथर्डी येथे प्राथमिक तर पाथर्डी येथे माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरविल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्या सर्व शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांकडून अनेक मोलाचे सल्ले मिळाले. आजही गावाकडे गेलो तर शिक्षकांना आवर्जून भेटतो. शालेय जीवनाचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्यानंतर मुंबई येथे पशू वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण झाले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि त्यात यशस्वीही झालो. तेथून थेट प्रशासकीय सेवेकडे वळलो. या सर्वांमध्ये मला मार्गदर्शन मिळाले ते अर्थातच सर्व गुरुजनांचे. आज शिक्षक दिनी सर्व गुरुजनांना वंदन...!
२९ वर्षांनंतरही गुरुंविषयी तेच प्रेम, तोच जिव्हाळा
मुंबई येथे पशू वैद्यकीय महाविद्यालयात लाभलेले शिक्षक आज योगायोगाने मी जेथे नोकरी करीत आहे, त्याच शहरात अर्थात जळगावात वास्तव्याला आहे. ते शिक्षक आहेत, डॉ. एम.बी. पाटील. महाविद्यालय सोडून २९ वर्षे झाली तरी आजही या गुरुंविषयी तोच जिव्हाळा असून तेच प्रेम कायम आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आजच त्यांना भेटून आलो. त्यांच्याकडूनही तेच प्रेम मिळाले.
शिक्षकांकडून मिळालेल्या प्रेरणेने प्रशासकीय सेवेत
शाळेत असल्यापासून इतिहास, नागरिकशास्त्र व भूगोल हे माझे आवडीचे विषय. साहजिक आवडीच्या विषयांचे शिक्षकही आवडीचे शिक्षक ठरतात. सोबतच इतरही शिक्षक माझे आवडीचे आहे. कारण शाळेपासून शिस्त मोडणे मला आवडलेच नाही, त्यामुळे सर्वच शिक्षकांचा मी लाडका विद्यार्थी होतो. या सर्वांकडून तसेच आई-वडिलांकडून मला प्रेरणा मिळाली आणि मी प्रशासकीय सेवेत येऊ शकलो.
शाळेत टोपी विरुद्धच्या आंदोलनाना केला विरोध
प्रार्थनेच्यावेळी शाळेत गांधी टोपी घालणे सक्तीचे होते. त्याला अनेक विद्यार्थ्यांचा विरोध होता. त्यामुळे एकदा सर्व विद्यार्थ्यांनी गांधी टोपीविरोधात आंदोलन करीत या टोपीच्या वापरास विरोध केला. त्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी बोलविले व समजूत काढली. त्या वेळी काही विद्यार्थ्यांनी ऐकले काहींनी ऐकले नाही. त्या वेळी मीदेखील विद्यार्थ्यांना आंदोलन न करण्याचे सूचविले व हा शालेय शिस्तीचा एक भाग असल्याचे सांगितले.
जळगाव जिल्हाधिकारी म्हणून ११ फेब्रुवारी २०१९ पासून रुजू झाले आहेत.
शिक्षकाविना यशाचा टप्पा अशक्य