मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण येथे आजपासून श्री संत सोपान काका समाधी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 06:13 PM2018-12-26T18:13:09+5:302018-12-26T18:14:45+5:30
मुक्ताईनगर : तालुक्यातील श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान श्रीक्षेत्र मेहुण तापीतीर येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही सलग चौथ्या वर्षी श्री संत मुक्ताई ...
मुक्ताईनगर : तालुक्यातील श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान श्रीक्षेत्र मेहुण तापीतीर येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही सलग चौथ्या वर्षी श्री संत मुक्ताई वारकरी सेवा समितीतर्फे श्री संत सोपानकाका समाधी सोहळा २७ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१९ दरम्यान आयोजित केला आहे.
श्रीसंत सोपानकाका समाधी सोहळ्याच्या निमित्त शिवपुराण कथा, महारूद्र याग व नामसंकीर्तन सोहळा होणार आहे. शिवपुराण कथा प्रवक्ते श्रीहभप निरंजन भाईजी महाराज शिंदे श्रीक्षेत्र आळंदी हे राहतील. महारूद्र यागामध्ये पुरोहित व ब्रह्मवृंद शारंगधर महाराज व अतुल महाराज यावलकर राहतील. कलशपूजन श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज संजय महाराज देहूकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन रामराव महाराज मेहूणकर यांच्याहस्ते तर विणा व ग्रंथपूजन बाबुराव महाराज देवकर यांच्या हस्ते होणार आहे. दैनंदिन कार्यक्रमात पहाटे पाच ते सहा काकड आरती, सकाळी ८ ते १० महारूद्र याग, सकाळी १० ते १२ हरिकीर्तन, दुपारी २ ते ५ शिवपुराण कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन आणि त्यानंतर हरिजागर होणार आहे. गुरूवार, २७ रोजी तुकाराम महाराज सखारामपुरकर व माधवदास महाराज राठी, २८ रोजी रामकृष्ण महाराज सानप येवला व प्रभाकर दादा महाराज बोधले पंढरपूर, २९ रोजी दीपक महाराज शेळगावकर व रामेश्वर महाराज शास्त्री मुंबई, ३० रोजी सुनील महाराज झांबरे बीड व मुरारी महाराज नामदास पंढरपूर, ३१ रोजी सुशांत महाराज फुलंब्री व बाबासाहेब महाराज इंगळे बीड, १ जानेवारी रोजी प्रकाश महाराज जवंजाळ चिखली व पद्माकर महाराज देशमुख अमरावती, २ रोजी भास्करगिरी महाराज श्रीक्षेत्र देवगड व श्रीपाद महाराज भडंगे सोलापूर यांची कीर्तने होणार आहे. समारोपाच्या दिवशी ३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज चैतन्य महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि त्यानंतर महाप्रसाद वितरण होईल, असे आयोजक श्रीसंत मुक्ताई वारकरी सेवा समिती श्रीक्षेत्र मेहुण तापीतीर यांनी कळविले आहे.