रावेरला श्री दत्तजयंती निमित्ताने ३१ डिसेंबर रोजी श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 01:49 PM2020-12-29T13:49:37+5:302020-12-29T13:50:39+5:30

श्री दत्तजयंती निमित्ताने श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Shrikrishna-Datta Rathotsav on 31st December on the occasion of Shri Datta Jayanti to Raver | रावेरला श्री दत्तजयंती निमित्ताने ३१ डिसेंबर रोजी श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव

रावेरला श्री दत्तजयंती निमित्ताने ३१ डिसेंबर रोजी श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव

Next
ठळक मुद्देकोरोनातील लोकोत्सव१० तासांची नगरप्रदक्षिणा यंदा केवळ पाच पावलांच्या रथोत्सवावर

किरण चौधरी
रावेर: श्री दत्तजयंती निमित्ताने ३१ डिसेंबर रोजी श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनामुळे एरव्ही १० तासांची नगर प्रदक्षिणा यंदा केवळ पाच पावलं मार्गक्रमण करून करण्यात येणार आहे.
श्री क्षेत्र माहूरच्या दत्त शिखरावर १२ वर्षे तपोसाधना केलेल्या सद्गुरू श्री सच्चिदानंद स्वामी महाराजांनी त्यांना साक्षात मलंग स्वरूपातील श्री दत्तप्रभुंनी कृपाप्रसाद म्हणून दिलेल्या त्यांच्या निर्गुण पादुका व पांढऱ्या रंगाचे निशाण घेऊन येथील पावन भूमीत नाला परिसरात साक्षात श्री क्षेत्र गाणगापूर सुस्वरूप श्री दत्तक्षेत्र उभारले आहे. या पावन भूमीत नवचैतन्याचा बहर आणण्यासाठी संजीवन समाधी घेतलेल्या श्री दत्तस्वरूप सच्चिदानंद स्वामींनी श्री दत्तजयंतीनिमित्ताने मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेनिमीत्त रूढ केलेला " श्रीकृष्ण-दत्त " रथोत्सव ३१ डिसेंबर रोजी कोरोनाचे निर्बंध पाळून साजरा होत आहे. या रथोत्सवाला सुमारे १८२ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. 
           या धार्मिक उत्सवाला शहरवासीयांसह खान्देश तथा निमाड प्रांतातील श्री दत्तभक्त परिवाराचा वर्षानुवर्षांपासून मिळणारा उदंड प्रतिसाद मिळतो. मात्र यंदा कोरोनामुळे या लोकोत्सवावर विरजण पडले आहे. लालबहादूर शास्त्री चौकात रथाचे परंपरांगत सुपूजन करून तब्बल १० तास शहरातील नगरप्रदक्षिणेचा लोकोत्सव मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केवळ पाच पाऊले रथ ओढून परंपरा अबाधित राखली जाणार आहे. 
रावेर शहराच्या पावन नाला भागात सुमारे २०८ वर्षांपूर्वी साक्षात श्री दत्तस्वरूप सद्गुरू श्री स्वामी सच्चिदानंद स्वामी महाराजांनी त्यांच्या पद पावनस्पर्शाने बस्तान मांडून उभारलेल्या श्री दत्तमंदिराला मूर्त स्वरूप आले आहे. शहरवासीयांसह तालुका तथा खान्देश व निमाड प्रांतातील लाखो दत्त भक्तांचे असीम श्रद्धास्थान ठरले आहे.  
१८२० च्या सुमारास श्री स्वामी सच्चिदानंद महाराजांनी एका कासाराला पंचधातूचे प्रमाण व दृष्टांत घडवत एकमुखी दत्तप्रभुंची १७ इंच उंचीची मूर्ती घडवून प्रतिष्ठापना केली.
      दरम्यान, सच्चिदानंद सद्गुरू श्री साईबाबांनी या दत्त मंदिरात भेट दिली असून, सद्गुरू सच्चिदानंद स्वामी महाराजांशी त्यांचा सत्संग झाल्याची आख्यायिका आहे. किंबहुना सद्गुरू श्री साई बाबांच्या आज्ञेनुसार त्यांचे परमशिष्य असलेल्या संत दासगणू महाराजांनी श्री सद्गुरू सच्चिदानंद स्वामी महाराजांचे गुरूचरित्र लिहीले आहे. 
श्री सद्गुरू स्वामी सच्चिदानंद महाराजांनी वयाच्या १०८ व्या वर्षी भाद्रपद शु नवमीला सन १८८८ मध्ये श्री दत्त मंदिरातच संजीवन समाधी घेतली आहे. त्यांच्या परंपरेत दुसरे गादीपती म्हणून माधवनाथ महाराज, तिसरे गादीपती म्हणून केशवदास महाराज, चौथे गादीपती म्हणून भानुदास महाराज तर पाचवे गादीपती म्हणून श्रीपाद महाराज सेवारत आहेत. रथावरील श्रीकृष्ण मूर्ती व श्री दत्त प्रभूच्या निर्गुण पादुकांचे सुपूजन व सेवा बजावण्याची परंपरा राजगुरू परिवार बजावत असून, रामचंद्र राजगुरू, विकास राजगुरू, धनंजय राजगुरू, विशाल राजगुरू सेवा बजावत आहेत. रथाला मोगरी लावण्यासाठी कासार, लोहार व बारी समाजाची परंपरा असून कैलास कासार, भूषण कासार, नीलेश बारी, मुकेश बारी, तर मशाल लावण्यासाठी नाभिक समाजाची परंपरा असून देवीदास चौधरी हे सेवा बजावत आहेत.  
 

Web Title: Shrikrishna-Datta Rathotsav on 31st December on the occasion of Shri Datta Jayanti to Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.