मुक्ताईनगर येथे सफला एकादशीनिमित्त वारकऱ्यांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 09:25 PM2019-12-22T21:25:17+5:302019-12-22T21:27:36+5:30
सफला अर्थातच मार्गशीर्ष कृ. एकादशीनिमित्ताने मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे लाखावर आलेल्या भाविकांनी संत मुक्ताईचे दर्शन घेतले.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : सफला अर्थातच मार्गशीर्ष कृ. एकादशीनिमित्ताने मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे लाखावर आलेल्या भाविकांनी संत मुक्ताईचे दर्शन घेतल्याने कोथळी आणि मुक्ताईनगर येथे अक्षरश: वारकऱ्यांची मांदियाळी रविवारी बघायला मिळाली.
चातुर्मास समाप्तीनंतर येणारी पहिलीच वारी व पवित्र मार्गशीर्ष मासात येणाºया एकादशीला अधिक महत्त्व असल्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी येथे सोमवारपासून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. पहाटे काकडारती मंगलमय वातावरण तयार झाले असताना संत मुक्ताबाई अभिषेक पूजा प्रमोद पांडव नांदुरा यांनी सपत्निक केली, तर नवीन मंदिरात अभिषेक शैलेश शांताराम महाजन, जोतिताई शैलेंद्र महाजन यांनी केले.
जुन्या मुक्ताबाई मंदिरात गजानन कासार बोदवड, गंभीर चौधरी विटवेकर, विष्णू राणे कोथळी, वाघाडी गावकरी यांनी आठ क्विंटल साबुदाणा खिचडी वाटप केले. विठ्ठल मंदिरात चिनावलच्या ग्रामस्थांनी फराळ वाटप केले, तर नवीन मुक्ताबाई मंदिरात जगनाथ सुपडू माळी वरणगाव, कडू पाटील धामदे आणि शांताराम तुकाराम महाराज (तुरकगोरडा, मध्य प्रदेश) यांनी फराळ वाटप केले.
दुपारी दर्शन रांगेत २० हजारावर भाविक प्रतीक्षेत होते. दुपारी महाराज खोडके यांचे कीर्तन तर रात्री रविदास महाराज यांचे कीर्तन झाले. नवीन मुक्ताबाई मंदिरात विजय महाराज खवले यांचे कीर्तन झाले.
सपोनि शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवल्यामुळे रस्त्यांची कामे सुरू असूनही भाविकांची गैरसोय झाली नाही.
सफला एकादशीनिमित्त जवळपास लाखाच्या वर भाविकांनी आज दर्शन घेतले. जुन्या मुक्ताबाई मंदिरावर कोथळी गावाकडून असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत व त्याच्याही बाहेर दर्शनाची रांग पोहोचलेली होती. तसेच नवीन मुक्ताई मंदिरातदेखील तीच परिस्थिती होती. मुक्ताईच्या दर्शनासाठी मध्य प्रदेशातील बºहाणपूर जिल्हा, खंडवा जिल्हा, विदर्भातील बुलढाणा व जळगाव जिल्ह्यातून जवळपास ४० ते ५० दिंड्या या दर्शनासाठी दाखल झालेल्या होत्या.
सोमवारी सद्गगुरू झेंडूजी महाराज बेळीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने गादीसेवक भरत महाराज पाटील यांचे कीर्तन होईल.