नशिराबादला श्रींचा पुण्यतिथी सोहळा रद्द, केवळ अभिषेक अन् पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 01:46 PM2020-05-14T13:46:19+5:302020-05-14T13:50:02+5:30

संत झिपरू अण्णा महाराज यात्रा, गाभाऱ्यातच प्रदक्षिणा

Shri's Punyatithi ceremony canceled at Nasirabad, only Abhishek and Pujan | नशिराबादला श्रींचा पुण्यतिथी सोहळा रद्द, केवळ अभिषेक अन् पूजन

नशिराबादला श्रींचा पुण्यतिथी सोहळा रद्द, केवळ अभिषेक अन् पूजन

googlenewsNext

नशिराबाद : यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाउन असल्याने येथील ग्रामदैवत व देश-विदेशासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प. पू. संत झिपरू अण्णा महाराज यांच्या ७१ व्या पुण्यतिथी यात्रोत्सव सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यानिमित्त दरवर्षी होणारे किर्तन कथा प्रवचन सर्व कार्यक्रम रद्द केले आहे.
उत्सवाची परंपरा खंडित होवू नये, यासाठी शासनाचे नियम पाळत श्रींच्या पुण्यतिथीच्या दिवशी १६ मे रोजी श्रींच्या मूर्तीस अभिषेक, पूजन व पादुकांची मंदिरातील गाभाºयातच प्रदक्षिणा करून जागेवर स्थापना पूजन होईल. भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहनही झिपरू अण्णा महाराज स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. परंपरा व उत्सवात खंड पडू नये, यासाठी यंदा श्रींच्या समाधी मंदिरात पुजारी जयंत गुरव यांनी एकट्याने दीपोत्सव केला.
संत झिपरू अण्णा महाराज मुळचे नशिराबादचे. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १८७७मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव कासाबाई (सावित्रीबाई) तर वडिलांचे नाव मिठाराम होते. त्यांना एक भाऊ, एक बहीण होती. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. पत्नीचे नाव मथुराबाई (कस्तुराबाई) होते. वयाच्या १४व्या वर्षापर्यंत अण्णा महाराजांनी विणकाम केले. त्याकाळी नशिराबाद विणकामात महाराष्ट्रात प्रसिद्ध व अग्रेसर होते. झिपरूअण्णा महाराजांचे अण्णा हे टोपण नाव होते. समाधी मंदिराजवळ असलेल्या शनी मंदिरातील कल्याणदास महाराज यांच्याशी अण्णा महाराजांचा परिचय झाला. कल्याणदास महाराजांनी झिपरूअण्णा महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना दीक्षा दिली, तेव्हापासून ते विरक्त झाले. ते पूर्ण ब्रह्म चिंतनात राहू लागले. त्याचवेळी थोर संत वैरागी म्हणून अण्णांचा लोकीक सर्वत्र भूतलावर पसरत गेला. घराची व संसाराची तमा न बाळगता अण्णा महाराज वैराग्य स्थितीत राहू लागले. अंगावरील कपड्यांचा त्याग करून ते दिगंबर अवस्थेत राहू लागले. काही दिवसात त्यांचे साक्षात्कार चमत्कार दिसायला लागले.
२१ मे १९४९ला वैशाख वद्य नवमीला महाराजांची निर्वाण झाले. कै.भैय्याजी हनुमंत कुलकर्णी उर्फ भैयामास्तर यांच्याकडे अण्णा महाराजांचे आयुष्य गेले. वैशाखातील रणरणत्या उन्हात महाराजांच्या अंत्ययात्रेत पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. माझा देह पूज्य गुरु कल्याण दास महाराजांच्या मठात जवळ ठेवावा, अशी अण्णा महाराजांची इच्छा होती. त्यानुसार त्यांचा देह मठाजवळ ठेवण्यात आला. समाधी बांधण्यात आली. त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम त्यांच्या निर्वाण दिनापासून आयोजित केला जातो. १५ फेब्रुवारी १९७९ला जयपूर येथून आणलेल्या श्रींच्या मूतीर्ची प्राणप्रतिष्ठा कानळदा आश्रमातील चंद्र्रकिरण महाराज यांच्याहस्ते झाली होती.

Web Title: Shri's Punyatithi ceremony canceled at Nasirabad, only Abhishek and Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव