विवाहित शिक्षकाचे तरुणीसोबत ‘शुभमंगल’
By admin | Published: March 4, 2017 12:49 AM2017-03-04T00:49:18+5:302017-03-04T00:49:18+5:30
जळगाव : पहिली बायको व पाच वर्षांचा मुलगा असताना एका शिकवणी चालकाने सोबत असलेल्या तरुणीला पळविले व तिच्याशी लग्न करून प्रमाणपत्रासह ते दोघं शुक्रवारी दुपारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हजर झाले.
जळगाव : पहिली बायको व पाच वर्षांचा मुलगा असताना एका शिकवणी चालकाने सोबत असलेल्या तरुणीला पळविले व तिच्याशी लग्न करून प्रमाणपत्रासह ते दोघं शुक्रवारी दुपारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हजर झाले. मुलगी पोलीस स्टेशनला आल्याचे कळताच पालकांनी पोलीस स्टेशन गाठले, मात्र मुलीने पालकांना ओळखण्यास नकार देत त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला.
या घटनेची माहिती अशी की, राष्टÑीय महामार्गाला लागून असलेल्या एका शिकवणी चालकाकडे ही २२ वर्षीय तरुणी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी येत होती. या दरम्यान तिचे त्या शिक्षकाशी सूत जुळले. प्रेम अधिकच बहरल्याने दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. शिकवणीला जावून येते असे सांगून गेल्या आठवड्यात ही तरुणी घरातून गेली, ती शुक्रवारी शिकवणी चालकाशी विवाह करूनच परतली. आळंदी येथे दोघांनी रितसर विवाह केला व त्याचे प्रमाणपत्र घेऊन दोघंही पोलीस स्टेशनला हजर झाले.
क्लास चालकाला ५ वर्षाचा मुलगा
ही तरुणी ज्या शिकवणी चालकासोबत पळून गेली, त्याचे आधी लग्न झालेले असून त्याला पाच वर्षाचा मुलगा आहे. या तरुणीसोबत सूत जुळल्याने त्याने पत्नी व मुलाला माहेरी पाठवून दिले आहे.
तू कोण, मी तुला ओळखत नाही...
मुलगी हरविल्याची नोंद याच पोलीस स्टेशनला झाली होती. दोघंही पोलीस स्टेशनला आल्यानंतर तपासाधिकारी सुभाष वराडे यांनी दोघांच्या पालकांना फोन करून बोलावून घेतले. तरुणीच्या आई व वडिलांंनी बेटा..घरी चल, म्हणत विनंती केली, तर चुलत भावानेही तिला विनंती केली असता मात्र ‘ तू कोण, मी तुला ओळखत नाही’ असे म्हणत भावाला ओळखण्यास तिने नकार दिला. हतबल होऊन तरुणीचे पालक माघारी परतले.