शंभर वर्षांपासून रंगणारा पत्त्यांचा डाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 06:46 PM2019-05-10T18:46:16+5:302019-05-10T18:46:48+5:30
आखाजीला पंच मंडळाचा ठराव : धरणगाव येथील निर्णयाचे सर्वत्र स्वागत
धरणगाव : येथील मोठा माळी वाडा समाज पंच मंडळाने या वर्षापासून माळी वाड्याच्या परिसरात तसेच रामलीला चौकात आखाजीस पारंपरिक पध्दतीप्रमाणे पत्ते खेळणे बंद करण्याचा ठराव केला. आणि या ठरावाची कडक अमंलबजावणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शंभर वर्षांपासून येथील माळी वाड्यात आखाजीनिमित्त रंगणारा पत्त्यांचा डाव बंद झाला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. या निर्णयाचा आदर्श अवघ्या खान्देशने घ्यावा, असा सूर निघत आहे.
येथील मोठा माळी वाडा परिसरातील पंच मढीजवळ, रामलीला चौकात, जांजीबुवा चौकात दरवर्षी आखाजीनिमित्ताने परंपरेच्या नावाने तब्बल आठ दिवस बिनधास्तपणे पत्त्यांचा डाव रंगत असे. जुगारी कुणाचीही भीती न बाळता राजरोसपणे या चौकात पत्ते खेळत असत. त्यातून फक्त माळीवाड्यातच अदमासे दीड कोटीची उलाढाल होत असल्याचा अंदाज होता. मात्र भरवस्तीतील चौका-चौकात रंगणाऱ्या या डावामुळे पूर्ण वाड्याला यात्रेचे स्वरूप येत असे. महिला व बालकांवर याचा विपरीत परिणाम होत होता. कधी-कधी जुगाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी व्हायची. या सर्व बाबींचा विचार करून मोठा माळी वाडा पंच मंडळाने पंधरा दिवसांपूर्वी अध्यक्ष विठोबा नामदेव माळी, उपाध्यक्ष योगराज गिरधर महाजन, निंबाजी सदू महाजन, सचिव दशरथ महाजन व पंच मंडळाच्या उपस्थितीत बैठक घेऊन माळी वाडा परिसरात पत्त्त्यांचा डाव बंद करण्याचा ठराव करुन निर्णय घेण्यात आला होता. ७ रोजी आखाजी झाली. तसेच त्यानंतर चार दिवस चालणारी रामलीला सुरळीतपणे सुरू असून एकही दिवस एकही डाव यावर्षी माळी वाडा परिसरात खेळला गेलेला नाही. माळी समाज पंच मंडळाच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
मोठा माळी वाडा समाज पंच मंडळाने मीटिंग घेऊन या वर्षापासून माळी वाडा परिसरात पत्त्यांचा डाव बंद करण्याचा ठराव केला होता. या निर्णयाला सर्व प्रतिष्ठित मंडळींनीही पाठिंबा दिला होता. या निर्णयाची कडक अंमलबजावणी सर्वाच्या मदतीने झाली. यामुळे ‘केल्याने होत आहे...आधी केलेच पाहिजे’ या उक्तीचा प्रत्यय आला. सामाजिकदृट्या हा ऐतिहासिक निर्णय आहे, असे मला वाटते.
- योगराज गिरधर महाजन, उपाध्यक्ष, माळी समाज पंच मंडळ, धरणगाव.