भावा-बहिणींच्या पाठराखणीतून ‘ती,’ने जिंकला जीवनाचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 06:38 PM2019-08-14T18:38:31+5:302019-08-14T18:41:35+5:30
माझा दादा ना... लाखात एक! माझ्या पाठीमागे उभा राहिला. जेव्हा, केव्हाही हाक दिली. तेव्हा धावून आला. पैसे घेऊन. एक-दोन नाही, तब्बल तीन-चार लाखावर. तशीच माझी कोमल. कर्करोगासारख्या हादरवून सोडणाऱ्या आजारात बहीण तेजलला जपले. दूरचित्रवाहिनीवरील ‘एक हजारो मे मेरी बहना...’ कधीकाळी याच आजारावर येवून गेलेल्या सिरीयलप्रमाणे दोन्ही लेकींनी भाऊ नाही म्हणून बहिणी-बहिणींनी केलेली एकमेंकींची पाठराखण. यामुळेच कर्करोगाच्या विळख्यातून उपचारांती माझ्या मुलीला आजवर सुखरुप ठेवू शकली. कोळगावच्या ज्ञानज्योती भांडारकर (जगताप) हा अनुभव डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करुन देत कथन करतात. तेव्हा समोरच्याचं काळीज चर्रर्र झाल्याशिवाय रहात नाही.
संजय हिरे
खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : माझा दादा ना... लाखात एक! माझ्या पाठीमागे उभा राहिला. जेव्हा, केव्हाही हाक दिली. तेव्हा धावून आला. पैसे घेऊन. एक-दोन नाही, तब्बल तीन-चार लाखावर. तशीच माझी कोमल. कर्करोगासारख्या हादरवून सोडणाऱ्या आजारात बहीण तेजलला जपले. दूरचित्रवाहिनीवरील ‘एक हजारो मे मेरी बहना...’ कधीकाळी याच आजारावर येवून गेलेल्या सिरीयलप्रमाणे दोन्ही लेकींनी भाऊ नाही म्हणून बहिणी-बहिणींनी केलेली एकमेंकींची पाठराखण. यामुळेच कर्करोगाच्या विळख्यातून उपचारांती माझ्या मुलीला आजवर सुखरुप ठेवू शकली. कोळगावच्या ज्ञानज्योती भांडारकर (जगताप) हा अनुभव डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करुन देत कथन करतात. तेव्हा समोरच्याचं काळीज चर्रर्र झाल्याशिवाय रहात नाही.
एका भावाने एका विधवा बहिणीला पाठीराखा बनत संकटात दिलेला आर्थिक हात व आपल्याला भाऊ नाही म्हणून आजवर दर रक्षाबंधनाला दोन बहिणींनी एकमेकींनाच राखी बांधत घेतलेली एक दुसरीची काळजी. हाच तर भावा-बहिणींच्या नात्यातील पवित्र धागा गुंफणारा रक्षाबंधनासारखा सण संदेश देतोय. म्हणूनच ‘लोकमत’ने ही विण तुम्हा-आम्हासाठी उलगडलीय.
कोळगाव येथील शिंपी समाजातील कै.पोपट भांडारकर यांची कन्या ज्ञानज्योती. चाळीसगावचे सासर पण पती निधनानंतर माहेरीच असतात. त्या गुढे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून काम पहातात. मोठा भाऊ ज्ञानेश्वर प्राध्यापक म्हणून नोकरीला मुंबई येथे आहेत. भावानेच कोळगावी बांधलेल्या प्रशस्त बंगल्यात त्या आपली आई लक्ष्मीबाई व कोमल, तेजल या दोन मुली मिळून चारीजणी! घरसंसार चालवितात. मोठी कोमल बारावीत तर छोटी तेजल दहावीत येथीलच गो.पु.पाटील महाविद्यालयात शिकतात. पैकी तेजलला सहा महिन्यांपूर्वी नववीत असताना, थकवा वाटणे, हातपाय दुखणे, चक्कर व त्यापाठोपाठ तापाने फणफणणे ही लक्षणे दिसतात. मलेरिया, डेंग्यू चाचणी होते. यापैकी काहीच नसते. रक्तातील सफेद पेशी खूपच कमी होत गेल्यात. झटके जाणवू लागताच गुढे आरोग्य केंद्राचे डॉ.प्रशांत बोरसे यांनी रुग्णवाहिका पाठवत चाळीसगाव येथे जाण्याचा सल्ला योग्य वेळी दिला. पुढील उपचार डॉ.रणजीत राजपूत यांच्याकडे होत जीवावरचा धोका टळला. तेथे घेण्यात आलेल्या रिपोर्टवरुन त्यांनी इतर शक्यता गृहीत धरुन नाशिकला कर्करोग तज्ज्ञ डॉ.प्रीतेश जुनागडे यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. तेथे बोनमँरो टेस्ट होते. ल्युकेमिया अर्थात ब्लड कँन्सरचे (रक्ताचा कर्करोग) निदान होते.
बंधू माझा पाठीराखा
या आजारात योग्यवेळी निदान झाल्यानंतर तत्काळ उपचार झाल्यास त्यातून रुग्णास सहीसलामत बाहेर काढण्याची संधी अधिक असते. म्हणून ज्ञानज्योती यांनी बंधू ज्ञानेश्वरला कल्पना दिली. त्यांनी बहिणीला धीर दिला. उपचार महागडा असला तरी मी आहे ना, असे म्हणत पाठच्या बहिणीची पाठराखण केली. वेळोवेळी दवाखान्यात येत धीर दिला. पैशाचं सोंग करता येत नाही. पगारातून कसेबसे भागविणाºया बहिणीच्या आर्थिक स्थितीची जाणीव ठेवून त्यांनी भाची तेजलच्या उपचारावर आजवर आलेला चार लाखावरचा खर्च पेलत, आपले कर्तव्य निभावले. यात चंदा मामा से प्यारा मेरा मामा...! ही तेजलची असलेली भावना उगीचच नाही. तर माझा दादा (ज्ञानदा).. हा भावोद्गार बहीण ज्ञानज्योतीच्या तोंडून ऐकताना समोरच्याचा अहंकार आपसूक गळून जात बहीण-भावाच्या नात्यातील पवित्र, अमर बंधनापुढे नतमस्तक व्हायला होते.
भावा-बहिणींचे ट्रँगल
ज्ञानज्योती यांचे घरातले नाव माया. पाठची बहीण छाया नाशिकलाच असते. उपचाराच्या निमित्तानं तिथे दोन-तीन महिने वास्तव्य आलेच. कोळगाव ते नाशिक या फे-यांमधे जाणे, येणे, तेथील खर्च अशी सर्व जबाबदारी बहीण छाया व पाव्हुणे सुनील अहिरे यांनी उचलली. वेळेवर पाठच (पाठचे भाऊबहीण) काम येस..! हे जुने जाणत्यांचे बोल त्या साक्षात अनुभवत होत्या. येथे पैशांपेक्षाही पाठीमागे कुणीतरी आहे हा भावनिक आधार भावा-बहिणींच्या ट्रँगलमधून मिळाला, तो विकत घेता येत नाही, हेही तितकेच खरे.
एक हजारोमे मेरी बहना...
तेजलला ब्लड कॅन्सरचे निदान झाल्यापासून तिची डोळ्यात तेल घालून काळजी घेते ती तीची मोठी बहीण कोमल. घरात वृध्द आजी. आईची नोकरी. उपचाराच्यानिमित्तानं दोन-तीन महीने आई बाहेर. तिच्या अंगावर घर सोडलेलं. एकटीनेच घर साभाळणंं, यात तिची जोखीम मोठी. आपणास भाऊ नाही म्हणून येणाºया प्रत्येक राखी पुनवेला एकमेकींना राखी त्या आजवर बांधत आल्या. लहानीच्या आजारात आता मोठी तिचा भाऊ होत अशरक्ष तिची रक्षा करतेय. तिला वेळोवेळी औषध-पाणी, अंग चेपणे सर्वात या आजारात महत्वाचे म्हणजे गरमागरम खाणे वेळच्यावेळी तयार करुन तिला जेवू घालणे. न चुकता हा शिरस्ता ती पाळत आहे. आजारपणामुळे काही दिवस शाळा हुकल्याने तिचा मागे राहिलेला, न समजलेला अभ्यास तिची मोठी बहीण कोमल घरी करुन घेते. म्हणतात ना पाठीशी बहीण असावी... या उक्तीला सार्थ ठरवते. म्हणूनच तर एक हजारोमे मेरी बहना...! म्हणत तेजल कोमलला मिठी मारते तेव्हा या रक्षाकवचामुळेच कर्करोगाने तिला मारलेली मिठी सैल झाल्याची खात्री पटते. हे रक्षाबंधन त्यांच्यासाठी खास असेल कारण तेजलचा दुसरा बोन मँरो रिपोर्ट नील आला. आता अडीच वर्ष मेन्टेनन्स डोस चालणार आहे.
तुमही हो बंधू
इन-मीन १४-१५ वर्षे वयाच्या तेजलच्या कर्करोगावर मात करताना, सुरवातीला गुढे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत बोरसे व समवेतच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सरकारी चौकटीबाहेर जावून आपली स्टाफ मेंबर नव्हे तर बहीण मानून केलेले सहकार्य, माजी जिल्हा उपआरोग्य अधिकारी डॉ.व्ही.आर.मोरे, डॉ.रणजीत राजपूत व तेजलच्या कर्करोगाचे निदान होताच मानसिक कोलमडून पडताच मी तुमचा दुसरा भाऊ म्हणत धीर देणारे डॉ.प्रीतेश जुनागडे, उपचारापेक्षा पहिले शाळा असा हट्ट धरणाºया तेजलला नववीच्या वार्षिक परीक्षेत व आता जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून वर्गात शेवटी बसणाºया तेजलला तिथे जावून प्रसंगी घरी येत विषय समजावून सांगणारे गो.पु.पाटील विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, तिची काळजी घेणाºया वर्गमैत्रिणी या सर्वांनी तिला सांभाळून घेत पाठबळ दिले.
अश्रूंंचे मोल अनमोल : केमोथेरपीला पुरुन उरणारी ‘अश्रू, थेरपी
सर, मला केमोथेरपीचे साइड इफेक्ट सांगा.. डॉ.जुनागडे यांना तेजल विचारत होती. मी मग तशी काळजी घेईल, वागेन. मी रडले तर माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू येतील अन् मला माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू नको आहेत. जणू काही विलक्षण तेज तिच्यात संचारले होते. दुसरीकडे आपल्या तेजलला कर्करोग झालाय या विचारानेच गर्भगळीत झालेल्या आई ज्ञानज्योती. आयुष्यात कधी नव्हे त्या ढसाढसा रडताना पाहून डॉ.जुनागडे यांनी समजावलं. तुमचं हे रडणं पहिलं अन् शेवटच असावं. तुम्ही मला खचलेल्या नको आहात. पोरीला उभ करायचंय.. बस्स हीच हिंमतीची खुणगाठ आजवर बांधत त्यांनी पोरीकरता उपचारा दरम्यान डोळ्यातले अश्रू रोखून धरले.
आनंदाश्रू, दु:खाश्रू व नकाश्रू हे प्रकार असले तरी अश्रूंमधे प्रचंड ताकद असते. स्रीचे अश्रू रडूबाईचे नसतातच मुळी. ते हिंमत जागवितात. द्रोपदीच्या अश्रूंनी महाभारत घडविले. येथे अश्रूही मायलेकींसाठी एक उपचार पध्दती बनली होती. अश्रूंंचे मोल त्यांनी जाणले होते म्हणून ते न सांडण्यासाठी त्या एकमेकींना डोळ्यात तेल घालून जपत होत्या. केमोथेरपीत रसायने शरीरात सोडले जातात. यामुळे व्हेन (नसा) डॅमेज होतात. यासाठी पोर्ट मशीन बसविले जाते. त्याचा व तिसºया -चौथ्या केमोचा त्रास सुई टोचणे, विंचू चावणे यासारखा होत असूनही तेजलने सारे काही सहन केले. केमोमुळे डोक्यावरील केसांचा पुंजकाचा-पुंजका निघून जात असता, चेहरा विद्रूक होईल या भावनेने ती खचली नाही. उलटपक्षी मला ब्लड कॅन्सर झालाय असे हसत, सहज सांगत ती डॉ.प्रीतेश जुनागडे यांच्या हॉस्पीटलमधे तिच्या वार्डातील इतर कर्करोग पीडित रुग्णांचे मनोबल वाढवत असल्याचा अनुभव तिची आई सांगते. जणू काही कॅन्सर रुग्णांसाठी ती ब्रँण्ड अॅम्बेसेडर बनत, डॉक्टरांची आवडती झाली. कर्करोगग्रस्त रुग्णांची अवस्था पाण्यावाचून तडफडणाºया माशासारखी. त्याचे प्रतीक म्हणून सलाईनच्या नळीपासून तिने बनविलेला मासा ती थेट डॉ.जुनागडे यांना भेट देते. तेदेखील आनंदाने तिची भेट स्वीकारतात. ती इतकी धीट झालीय की, मी तीची आई नाही ती माझी आई बनलीय. तेजू या आजारात ग्रेट ठरलीय.