विश्वासात न घेताच ठरावावरघेतली स्वाक्षरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:52 PM2019-03-20T12:52:43+5:302019-03-20T12:52:52+5:30
नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांचे आयुक्तांना पत्र
जळगाव : मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याजागी डॉ.विकास पाटील यांची नियुक्ती करण्याचा ठरावावर आपणास विश्वासात न घेता माझी स्वाक्षरी घेण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा भाजपाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केला आहे. याबाबत दारकुंडे यांनी आयुक्तांना पत्र देखील दिले आहे.
मनपाची महासभा ५ मार्च रोजी पार पडली. या महासभेत भाजपाकडून मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील हे आरोग्य अधिकारीपदासाठी पात्र नसल्याने त्यांच्या जागेवर वैद्यकीय क्षेत्राचे जाणकार असलेले डॉ.विकास पाटील यांची नियुक्ती करण्यात यावी असा ठराव करण्यात आला होता. भाजपातील काही नगरसेवकांचा या ठरावाला विरोध असताना हा ठराव करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र, आता या ठरावावरून भाजपा नगरसेवकांकडून उघड-उघड नाराजी व्यक्त केली जात असल्याचे दिसून येत आहे.
नवनाथ दारकुंडे यांनी ७ मार्च रोजी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपातील गटबाजी पुन्हा उघड
कोणतीही महासभा होण्यापुर्वी भाजपाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेतली जाते. त्या बैठकीत पक्षाकडून आलेल्या प्रस्तावांवर चर्चा करून, त्या प्रस्तावाला मंजूरी द्यायची की नाही ? याबाबतची भूमिका निश्चित केली जाते. दारकुंडे यांनी भाजपाच्याच ठरावाला विरोध केल्यामुळे पक्षाकडून येणाऱ्या प्रस्तावाबाबत नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. भाजपाकडून याआधी गाळेधारकांवरील ५ पट दंड रद्द करण्याचा ठराव, यासाठी समिती स्थापन करण्याचा ठरावाच्या वेळी देखील अनेक नगरसेवकांना नाराजी व्यक्त केली होती. यावरून सत्ताधारी भाजपामध्ये धुसफूस सुरु असल्याचे म्हटले आहे.
ठराव बेकायदेशीर ठरण्याची भिती
दारकुंडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजपाकडून आरोग्य अधिकाऱ्यांचा बदलीबाबत महासभेत जो प्रस्ताव देण्यात आला होता. त्या प्रस्तावावर पक्षाकडून माझी स्वाक्षरी घेण्यात आली. मात्र, ही स्वाक्षरी मला विश्वासात न घेताच घेण्यात आली असल्याचे दारकुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. वास्तविक २०१३ ते २०१८ मध्ये नगरसेवक असताना डॉ.विकास पाटील यांना गैरकाराबाबत जबाबदार धरून त्यांना बडतर्फ करण्याचा ठराव करण्यात आला होता. तसेच त्यांची चौकशी करण्याचे देखील ठरले होते. मात्र, त्यांची या प्रकरणात चौकशी झालेली नाही. दरम्यान, भविष्यात त्यांना मुळ पदावर घेतल्यास हा ठराव बेकायदेशिर ठरण्याची भीती असल्याने त्यांच्या नियुक्तीस दारकुंडे यांनी विरोध दर्शविला आहे.
मागील वेळेस नगरसेवक होतो, त्यावेळी डॉ. विकास पाटील यांच्याविरोधात ठराव मांडला होता. आता त्यांच्या समर्थनार्थ ठराव करावा, हे पटत नसल्याने आपला ठरावास विरोध आहे.
- नवनाथ दारकुंडे, नगरसेवक.