स्वाक्षरी अस्पष्ट असल्याने जळगावात महावितरणच्या ११ परीक्षार्थींना प्रवेश नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:31 PM2018-10-21T12:31:53+5:302018-10-21T12:33:00+5:30
महावितरणच्या ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनिअरपदाच्या परीक्षेत गोंधळ
जळगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनिअरपदासाठी शनिवारी आयबीपीएसच्या वतीने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेदरम्यान शहरातील गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला़ केंद्र प्रमुखाकडील परीक्षार्थींच्या यादीत सही अस्पष्ट असल्याच्या कारणावरून पर्यवेक्षकाने ११ परीक्षार्थींना हॉलबाहेर काढले. ओळखीचा पुरावा असतानासुद्धा परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे परीक्षार्र्थींनी तीव्र संताप व्यक्त केला.
गुलाबराव देवकर अभियांत्रिकीच्या केंद्रावरील घटना
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत ट्रेनी इंजिनिअरपदाच्या ६३ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत शनिवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेदरम्यान १५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी आयबीपीएसतर्फे एका खासगी कंपनीला देण्यात आली होती. त्यानुसार शहरातील गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी सकाळी ८़३० वाजेपासून परीक्षार्थी जमले होते. महिला परीक्षा केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकाकडून परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रासह अन्य कागदपत्रांची तपासणी करून त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जात होता. मात्र, काही परीक्षार्थींची केंद्र प्रमुखाकडे असलेल्या यादीत सही अस्पष्ट होती़ त्यांना सही अस्पष्ट असल्याने ११ परीक्षार्र्थींना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश का नाकारला याची विचारणा त्या ११ परीक्षार्थींनी केली असता परीक्षा केंद्राप्रमुखाकडून कोणतेही उत्तर त्यांना मिळाले नाही़ फक्त या संकेतस्थळावर तक्रार करा एवढेच सांगून त्या निघून गेल्या़ तसेच परीक्षार्थींनी विनंती करूनही त्यांचे म्हणणे ऐकून न घेता परीक्षा हॉलचा दरवाजा बंद केला़ त्यानंतर आपले कुणीही ऐकून घेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलच्या बाहेरच ठिय्या मांडला़
अन् परीक्षार्र्थींना अश्रू अनावर
स्वत:ची चूक नसताना फक्त आॅनलाइन घोळामुळे सही अस्पष्ट आल्याच्या कारणावरून परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे ११ परीक्षार्थींपैकी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे परीक्षार्थींची समस्या जाणून घेण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केंद्र गाठले़ परीक्षार्र्थींचे म्हणणे समजून घेतले. त्यामुळे ते शांत झाले़
सन २०१५ पासून परीक्षेसाठी तयारी करीत होतो. सही अस्पष्ट असल्याच्या कारणावरून परीक्षा हॉलच्या बाहेर काढण्यात आले़ कुणीही आमचे ऐकून घेतले नाही़
-संदेश पाटील, परीक्षार्थी