जळगावात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमास मान्यतेचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:04 PM2018-12-06T12:04:25+5:302018-12-06T12:05:03+5:30
अहवाल तयार करून ‘एमसीआय’कडे रवाना
जळगाव : नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलेले भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे(एमसीआय) पथक सकारत्मक असल्याचे संकेत असून या अभ्यासक्रमास मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे समजते. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केल्यानंतर बुधवारी पथकाने आपला अहवाल तयार केला व तो कुरीयरने एमसीआयकडे पाठविला.
जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात जिल्हा रुग्णालयापासून झाली आहे. प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने तत्काळ द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव मागविला व त्यानुसार येथे द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी तयारीदेखील सुरू झाली. द्वितीय वर्षाच्या या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे(एमसीआय) पथक मंगळवारी सकाळी जळगावात दाखल झाले होते. या पथकात बंगलोर मेडिकल कॉलेज अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. बी. विश्वनाथ, भावनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. धर्मेश पटेल, उत्तर प्रदेश रुरल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटरचे प्रा. डॉ. स्नेहासीस भुनिया यांचा समावेश होता.
या तीन सदस्य असून त्यांनी द्वितीय वर्षासाठीच्या सर्व विभागांची तसेच रुग्णालयातील इतर कक्षांची पाहणी करून तेथील तयारीचा आढावा घेतला.
सकारात्मक अहवाल?
एमसीआयने ठरवून दिलेल्या नमुन्यामध्ये या पथकाने बुधवारी अहवाल तयार केला व तो कुरियरने दिल्ली येथे पाठविला. हा अहवाल सकारात्मक असून द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमास मान्यता मिळू शकेल, असे संकेत आहे.
या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे होते.