खान्देशातील विविध क्षेत्रातील महिला संतांचे लक्षणीय योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 06:09 PM2017-11-21T18:09:17+5:302017-11-21T18:09:33+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘संतांची मांदियाळी’ या सदरात साहित्यिक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांचा लेख ‘खान्देशातील महिला संत’
खान्देशातील संत परंपरेत महिला संतांची संख्या तुलनेने अल्प असली तरी प्रभाव आणि महत्त्वाच्या दृष्टीने विशिष्ट अशी आहे. मुक्ताईनगरला मुक्ताबाईंच्या समाधी स्थानापासून ही चर्चा सुरू होते. मूळ पंजाबच्या नाथपंथीय साध्वी सुंदरनाथ या किसन नाथांच्या शिष्या होत. सिंध हैद्राबाद येथे 1904 च्या सुमारास जन्म झाला. मंगळवारचा जन्म म्हणून नाव मंगला. आता त्या जन्मदात्या माता-पिता कुणाचेही नाव त्या सांगत नाहीत. बालपणीच दीक्षा घेतली. आता दीक्षागुरू किसननाथ याच माता आणि पिताही तेच. गुरूंच्या आदेशाने सातपुडय़ाच्या तोरणमाळ येथे गुंफांमधून साधनारत अशा या निरक्षर साध्वीचे काही लेखन उपलब्ध नाही. या गौरवर्णीय साध्वीच्या एका गुरूबंधूची समाधी मध्य प्रदेशात खेतिया येथील स्मशानातल्या भूतनाथ या शिवमंदिरानजीक असल्याचे समजते. अतिशय स्वच्छ हिंदी वाणी असलेल्या या साध्वी क्वचित सातपुडय़ातून खाली येऊन राहतात. साध्वी प्रभुदासी निजानंदी ताई महाराज या एक तपस्वी होऊन गेल्या. त्यांचे काही काळ खान्देशात वास्तव्य होते. पुण्याचे बळवंतराव घुले पिता आणि रुखमाबाई माता. पिता फौजदार, व्यायामपटू, हनुमंताचे भक्त होते. माता विठ्ठलभक्त होत्या. बळवंतरावांच्या आईचे गुरू अक्कलकोटचे श्री बाळअप्पा महाराज हे असून पती-प}ींचे गुरू केडगावचे श्री नारायण महाराज होते. बळवंतरावांना पाच पुत्र आणि एक कन्या. पौष शुद्ध एकादशीला 1 जानेवारी 1901 साली कन्यार} जन्माला आले. नाव ठेवले लीलावती. याच प्रभुदासी ताई महाराज होत. श्री माधवनाथ महाराजांनी ताई महाराजांवर अनुग्रह केला. श्री गुरू कृपेमुळे लीलावतीचे निजानंदी असे नाव झाले. त्यांचे शिक्षण हिंगणी येथील कव्रे बोर्डिगमध्ये झाले. विद्यार्थी दशेत असतानाही त्या एकाग्रतेने नामस्मरण करत असत. निजानंदीचे लौकिक शिक्षण फायनलर्पयत झाले. विठ्ठलभक्त बाळाजीपंतांनी त्यांचे नेमके मोठेपण ओळखले. पुढे तीन वर्षे त्यांनी साकोरी येथील श्री सद्गुरू उपासनी महाराज यांच्या आश्रमात वास्तव्य केले. या काळात मेहेर बाबांचीही वस्ती या आश्रमातच होती. श्री बाबाजानसारख्या महात्म्यांचाही आशीर्वाद ताईंना सहज लाभला. त्यांनी पुढे पुणे-नगर मार्गावर बेलवंडी येथे साधना केली. ताईंनी गायनकलेची साधना केली. माधवदास, बाबाजान यांच्या आदेशाने संगीत वर्गाची स्थापना झाली. नगर येथे श्री शंकर महाराजांचे दर्शन घेतले. त्यांच्या सत्प्रेरणेने श्री वृद्धेश्वर आदिनाथ शिवमंदिरात त्या दर्शनार्थ गेल्या. श्री शंकर महाराजांच्या उपस्थितीत पुसेसावलीचे महात्मा श्री गोविंद महाराज यांनी ताईंना दीक्षा दिली. संन्यासापूर्वी आणि संन्यास ग्रहण केल्यानंतरही ताईंनी अनेक सत्पुरुषांचे दर्शन घेतले. यात प्रामुख्याने केडगावचे श्री नारायण महाराज, अक्कलकोटचे श्री रंगनाथ महाराज, नगरचे विठ्ठलभक्त श्री बाळाजीबुवा, शिर्डीचे श्री साईबाबा, साकोरीचे श्री उपासनी महाराज, पुण्याचे श्री बाबाजान, मुंबईचे वारकरी पंथाचे श्री बंकटस्वामी, श्री गाडगे बाबा, नाशिकचे श्री बाळ अप्पा महाराज, गाणगापूरचे श्री अवधूतानंद आदी सत्पुरुषांचा उल्लेख करता येईल. चाळीसगाव येथील श्री हरिभाऊ कुलकर्णी हे ताईंचे परमभक्त होते. एरंडोल येथील श्री आठवले यांचाही आग्रह झाला आणि ताई 1936 साली खान्देशात आल्या होत्या. सद्गुरूनाथ माधवनाथांची अनुज्ञा झाली की खानदेशात मठ-मंदिर-आश्रम कार्य निजानंदी ताईंच्या हस्ते संपन्न होणार आहे. 1941 साली ताईंनी उंदिरखेडे येथे श्री रामनाम जपाचा स्वाहाकार करण्याचे योजिले होते. येथेच श्री नाथबन मठाची स्थापना करण्यात आली. नामसप्ताह, ग्रंथ पठण, उत्सव, यज्ञ, अन्नदान आदी धार्मिक उपक्रमात ताईंना अपरिमित गोडी होती. ताईंचे चरित्र ‘ताई महाराजांचे चरित्र’ या नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांनी चारधाम यात्रा केली होती. ताई महाराजांच्या गुरूपरंपरेचा आरंभ थेट आदिनाथांपासून सुरू होतो. त्यांनी क्वचित अभंग रचना केली होती. त्यांच्या चरित्र ग्रंथात सद्गुरू माधवनाथांच्या समाधीप्रसंगी केलेल्या धाव्याचे कवित्वयुक्त निवेदन येते. ‘सुबोध अभंगमाला’ या शीर्षकाने त्यांची दोन छोटी पुस्तके प्रसिद्ध आहेत. सद्गुरू माधवनाथ यांची समाधी इंदूर येथे आहे. समर्थ रामदास स्वामींचा शिष्य संप्रदाय जेवढा मोठा आहे त्या प्रमाणात त्यांच्या शिष्यिणींची संख्याही मोठी आहे. त्यांच्या बयाबाईसारख्या शिष्यिणीची तर हिंदीतूनही कविता आढळते. रामदास यांची एक शिष्यीण नबाबाई खान्देशात असण्याची दाट शक्यता आहे. नबाबाई हे नाव प्रथमदर्शनी नबी या मुस्लीम परंपरेशी समांतर वाटते पण ते नर्मदा या नावाचे मुखसुख उच्चारणाने सिद्ध झालेले नाव आहे. या नावाची नबी, नबा, नबू अशी विविध रुपे मराठी, हिंदी, गुजराती या तिन्हीही प्रांतात आणि भाषेत आढळतात. नबाबाईचा पत्ता आहे तापी काठ. आता हा पत्ता मूलताईपासून तर थेट रांदेर्पयतचा आहे. एकूणच नबाबाई हे संशोधकांना आव्हान आहे.