जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांची चुप्पी विरोधकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 11:13 PM2019-11-24T23:13:57+5:302019-11-24T23:14:31+5:30
समान निधी वादाचा ‘पॅटर्न’ रिपीट
जळगाव : जि.प.त जिल्हा नियोजनकडून आलेल्या निधीच्या समान वाटणीवरून उठलेल्या वादळात अखेर भाजपने त्यांच्या सदस्यांना जवळ करून त्यांना शांत केले मात्र, या वादात भाजपच्या गटाला साथ देणाºया विरोधकांचे नुकसान झाले आहे़ गेल्या वेळी जी खेळी भाजपने खेळली तीच पुन्हा रिपीट झाल्याने विरोधकांना पुन्हा भोपळा मिळाला आहे़
जिल्हा नियोजनकडून मिळालेल्या निधीच्या ३० टक्के उर्वरित निधीतून सुमारे २० कोटींच्या वर रूपयांची कामे अध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेते व काही सदस्यांनी परस्पर वाटून घेतल्याचा आरोप करीत भाजपसह राष्ट्रवादी व सेनेच्या काही सदस्यांनी केला होता व थेट स्थायी समितीची सभाच रोखून जाब विचारला होता़ तीन दिवस हा वाद गाजला अखेर अध्यक्ष निवडीच्या वेळी गोंधळ नको म्हणून भाजपच्या वरिष्ठांनी जि़ प ़ गटनेते पोपट भोळे यांच्यावर जबाबदारी सोपवून हा वाद मिटविण्याचे सांगितले.
विरोधकांचा मार्ग चुकला?
निधीत समान हिस्सा मिळावा यासाठी भांडणाऱ्यांमध्ये अनेक विरोधकही होते़ या सदस्यांनी भाजपच्या गटाबरोबर जाण्यापेक्षा त्यांच्या पक्षांच्या गटनेत्यांच्या माध्यमातून अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्याकडे मागणीचे प्रस्ताव पाठवायला हवे होते़ ते नियमात बसणारे व प्रोटोकॉल पाळणारे राहिले असते़ किमान काही कामे मिळविता आली असती, असे काही वरिष्ठ सदस्य सांगतात़ मात्र, या सदस्यांनीही तीच चूक केली जी गेल्यावेळी शिवसेनेच्या सदस्यांनी केली होती़ तेव्हाही भाजपच्या गटाने सेना सदस्यांना एकटं सोडल होते़ या गटाबरोबर जावू नका तुमचे नुकसान होईल, असेही काही सदस्यांनी विरोधी सदस्यांना समजावले होते़
नाराजांना २० लाख
समान निधीवरून सुरू झालेल्या या वादात भाजपच्या नाराज सदस्यांना २०-२० लाख रूपयांची कामे मिळाल्याचे सूत्रांकडून समजते़ यानंतर या सदस्यांनी माघार घेतल्याने हे वादळ शमले़ अध्यक्षपदात गट-तट नको यासाठी भाजपने काळजी म्हणून अतिशय तत्काळ ही बैठक घेऊन हा विषय मार्गी लावल्याचे चित्र आहे़