युद्धाने स्वस्ताईचे स्वप्न भंग, चांदी पुन्हा ७० हजार; सोने ५९ हजारांच्या उंबरठ्यावर
By विजय.सैतवाल | Published: October 11, 2023 04:04 PM2023-10-11T16:04:19+5:302023-10-11T16:05:52+5:30
सोन्याचे भावही ५८ हजार ८०० रुपये प्रति तोळा होऊन ते ५९ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
जळगाव : दिवाळीपर्यंत सोने-चांदीचे भाव कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात असताना हमास व इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे स्वस्ताईचे स्वप्न भंगले असून या मौल्यवान धातूंच्या दरात दररोज वाढ होत आहे. बुधावर, ११ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ती पुन्हा ७० हजार रुपये प्रति किलो झाली. सोन्याचे भावही ५८ हजार ८०० रुपये प्रति तोळा होऊन ते ५९ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
पितृपक्ष सुरू झाल्यानंतर सोने-चांदीचे भाव कमी होऊ लागले. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती पाहता हे भाव दिवाळीपर्यंत आणखी कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. असे असताना मध्येच हमास व इस्त्रायल यांच्यातील युद्ध भडकले व त्याचा मोठा परिणाम होऊ लागला. त्यामुळे गेल्या आठवड्यात कमी होत जाणारे भाव आता पुन्हा वाढू लागले आहे.
१० दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात एकाच दिवसात ८०० रुपयांची घसरण झाली व तेव्हापासून त्याचे भाव कमी होत जाऊन ५७ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत खाली आले होते. मात्र हे युद्ध भडकले आणि पुन्हा भाववाढ होण्यास सुरुवात झाली. त्यानुसार ६ ऑक्टोबर रोजी ५८ हजार ६०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ७ रोजी ३०० रुपयांची, ८ रोजी ६०० रुपयांची वाढ झाली. १० व ११ ऑक्टोबर रोजी पुन्हा भाववाढ होऊन सोने ५८ हजार ८०० रुपये प्रति तोळा झाले.
पाच दिवसात चांदी २१०० रुपयांनी वधारली
सोन्यासोबतच चांदीच्याही भावात वाढ होत आहे. ६ ऑक्टोबर रोजी ६७ हजार ९०० रुपये प्रति किलोवर असलेल्या चांदीच्या भावात ७ रोजी एकाच दिवसात एक हजार ६०० रुपयांची वाढ होऊन ती ६९ हजार ५०० रुपये प्रति किलो झाली. ९ ऑक्टोबर रोजी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली. १० रोजी ३०० रुपयांची घसरण झाली मात्र ११ ऑक्टोबर रोजी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. पाच दिवसात चांदीत दोन हजार १०० रुपयांची वाढ झाली आहे.
६० हजारांच्या पुढे जाणार सोने
गेल्या १० दिवसांपूर्वी काही दिवस सोने-चांदीचे भाव कमी झाले होते. मात्र हमास व इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे हे भाव पुन्हा वाढू लागले आहे. दिवाळीपर्यंत सोने ६० हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकते.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सुवर्ण बाजार असोसिएशन.