चांदी पुन्हा ७० हजारांच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:16 AM2020-12-22T04:16:51+5:302020-12-22T04:16:51+5:30
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून किरकोळ चढ-उतार होत असलेल्या सोने-चांदीपैकी चांदीच्या भावात सोमवारी मोठी वाढ होऊन ती चार महिन्यांनंतर ...
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून किरकोळ चढ-उतार होत असलेल्या सोने-चांदीपैकी चांदीच्या भावात सोमवारी मोठी वाढ होऊन ती चार महिन्यांनंतर पुन्हा ७० हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. रविवारी ६८ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात सोमवार, २१ डिसेंबर रोजी थेट दोन हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ७१ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोन्याच्याही भावात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५१ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. सट्टा बाजारात खरेदी वाढल्याने चांदीचे अचानक भाव वाढल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या काळात सोने-चांदीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून उलाढाल वाढली. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात चांदी थेट ७७ हजारांच्या पुढे तर सोने ५७ हजारांच्या पुढे पोहोचले होते.
सोमवार, २१ डिसेंबर रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीच्या भावात थेट दोन हजार ५०० रुपये प्रति किलोने वाढ होऊन ती ६८ हजार ५०० रुपयांवरून ७१ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोन्याच्या भावात केवळ २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५१ हजार २०० रुपयांवरून ५१ हजार ४०० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.
सट्टा बाजारात खरेदी वाढली
तसे पाहता सध्या लग्नसराईमुळे चांदीच्या तुलनेत सोन्याला अधिक मागणी आहे. मात्र सोन्याचे भाव त्या तुलनेत न वाढता चांदीच्या भावात अधिक वाढ झाली आहे. सट्टा बाजारात चांदीची खरेदी अधिक वाढल्याने चांदीच्या भावात कृत्रिम वाढ केली जात असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
चांदीच्या भावातील स्थिती
दिनांक चांदीचे भाव
७ जुलै २०२० ५०, ५००
२१ जुलै ६०,५००
२८ जुलै ६७, ५००
५ ऑगस्ट ७१,०००
६ ऑगस्ट ७३,५००
७ ऑगस्ट ७७,५००
१२ ऑगस्ट ६३,५००
२१ डिसेंबर ७१,०००
——————
सध्या लग्नसराईमुळे चांदीच्या तुलनेत सोन्याला अधिक मागणी आहे. मात्र चांदीला सट्टा बाजारात अचानक मागणी वाढल्याने तिचे भाव वाढले आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ बाजार असोसिएशन