चांदी पुन्हा दोन हजाराने गडगडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:34 PM2020-08-27T12:34:17+5:302020-08-27T12:35:27+5:30
सोनेही ९०० रुपयांनी घसरले
जळगाव : सोने-चांदीच्या भावात घसरण सुरूच असून बुधवार, २६ आॅगस्ट रोजी चांदीच्या भावात पुन्हा दोन हजार रुपयांनी तर सोन्याच्या भावात ९०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे चांदी ६४ हजार रुपये प्रति किलोवर आली तर सोनेही ५१ हजार २०० रुपयांवर आले आहे.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सातत्याने भाव वाढ होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात आता दोन आठवड्यांपासून मात्र घसरण सुरू आहे. सट्टाबाजारात दलालांनी सोने चांदीची खरेदी थांबविल्याने भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५७ हजार २०० रुपयांवर पोहचलेल्या सोन्याच्या भावात दोन आठवड्यात ५ हजार १०० रुपयांनी घसरण होऊन सोमवार, २४ आॅगस्ट रोजी सोने ५२, १०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. अशाच प्रकारे ७७ हजार ५०० रुपयांवर पोहचलेल्या चांदीच्या भावात दोन आठवड्यात ११ हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन २४ आॅगस्ट रोजी चांदी ६६,००० हजार रुपये प्रति किलोवर आली. त्यानंतर पुन्हा आता २६ आॅगस्ट रोजी चांदीच्या भावात दोन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६४ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. तसेच २६ आॅगस्ट रोजी सोन्याच्याही भावात ९०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार २०० रुपये प्रति तोळ््यावर आले आहे.