चांदीच्या भावात एकाच दिवसात ५८०० रुपयांनी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:12 AM2021-01-10T04:12:49+5:302021-01-10T04:12:49+5:30
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून ६९ ते ७१ हजारादरम्यान असणाऱ्या चांदीच्या भावात शनिवार, ९ जानेवारी रोजी एकाच दिवसात तब्बल ...
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून ६९ ते ७१ हजारादरम्यान असणाऱ्या चांदीच्या भावात शनिवार, ९ जानेवारी रोजी एकाच दिवसात तब्बल पाच हजार ८०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे चांदीचे भाव ७० हजार ३०० रुपयांवरून थेट ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आले. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात एक हजार रुपयांनी घसरण होऊन ते ५० हजार ६०० रुपयांवर आले. कोरोनावरील लसच्या ‘ड्राय रन’चा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोना काळात सोने-चांदीत मोठी गुंतवणूक वाढल्याने त्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत गेले. मात्र मध्यंतरी रशियाकडून लसीची घोषणा झाल्याने १२ ऑगस्ट २०२० रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात १२ हजार रुपयांनी तर सोन्यात चार हजाराने घसरण झाली होती. त्यानंतर आता प्रत्यक्षात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’ होताच सोने-चांदीचे भाव पुन्हा घसरले आहे. यात शुक्रवार, ८ जानेवारी रोजी ७० हजार ३०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात शनिवार, ९ जानेवारी रोजी पाच हजार ८०० रुपयांनी घसरण होऊन ती ६४ हजार ५०० रुपयांवर आली. तसेच शुक्रवारी ५१ हजार ६०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात शनिवारी एक हजार रुपयांनी घसरण होऊन ते ५० हजार ६०० रुपयांवर आले.
वर्ष अखेरीस ३१ डिसेंबर २०२० रोजी ६९ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी रोजी ५०० रुपयांनी घसरण होऊन ती ६९ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. तर ३१ डिसेंबर रोजी ५० हजार ८०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १ जानेवारी रोजी २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५१ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. त्यानंतर चांदीचे भाव ६९ ते ७१ हजारादरम्यान राहून ९ जानेवारी रोजी तर मोठी घसरण झाली.