चांदीला चंदेरी धार! दिवसात १४०० ने वाढ, भाव ८७ हजार चारशे पार
By विजय.सैतवाल | Published: May 17, 2024 05:17 PM2024-05-17T17:17:16+5:302024-05-17T17:18:34+5:30
आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढली मागणी : सोने ७३,८०० रुपयांवर स्थिर.
विजयकुमार सैतवाल, जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून भाववाढ सुरू असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवार, १७ मे रोजी तर एकाच दिवसात एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ८७ हजार ४०० रुपये प्रति किलो अशा विक्रमी भावावर पोहचली आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव ठरला आहे. सोन्याचे भाव ७३ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे.
मार्च महिन्यात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना चांदीच्या भावात फारसी वाढ नव्हती. एप्रिल महिन्यात चांदीच्याही भावात वाढ सुरू झाली. नंतर मात्र एप्रिलच्या अखेरीस भाव कमी झाले. पुन्हा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते वाढू लागले. त्यात १३ मेपासून तर सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये ८४ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १३ मे रोजी ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. दुसऱ्या दिवशी १४ रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८५ हजार रुपयांवर पोहचली.
१५ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर १६ रोजी एक हजार रुपयांची वाढ झाली व चांदी ८६ हजार रुपये प्रति किलो अशा उच्चांकी भावावर पोहचली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात १७ मे रोजी हा उच्चांक मागे टाकत थेट एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन चांदी ८७ हजार ४०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. दोन दिवसात चांदीत दोन हजार ४०० रुपयांची वाढ नोंदली गेली आहे.
एकीकडे चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना १६ मे रोजी सोन्याच्या भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. १७ रोजी मात्र ते याच भावावर स्थिर राहिले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सट्टा बाजारात अचानक चांदीची मागणी वाढवण्यात आल्याने ही भाववाढ होत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.