अबब! चांदीच्या भावात एकाच दिवसात ५ हजारांनी वाढ, सोनेही ६०० रुपयांनी वधारले

By विजय.सैतवाल | Published: October 4, 2022 04:54 PM2022-10-04T16:54:56+5:302022-10-04T16:57:33+5:30

चांदी ५७ हजार रुपयांवरून थेट ६२ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. चांदीचे तीन महिन्यातील हे उचांकी भाव आहे.

Silver price increased by 5 thousand in a single day, gold also increased by 600 rupees | अबब! चांदीच्या भावात एकाच दिवसात ५ हजारांनी वाढ, सोनेही ६०० रुपयांनी वधारले

अबब! चांदीच्या भावात एकाच दिवसात ५ हजारांनी वाढ, सोनेही ६०० रुपयांनी वधारले

googlenewsNext

जळगाव - गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने भाववाढ होत असलेल्या चांदीच्या भावात मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात थेट पाच हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ५७ हजार रुपयांवरून थेट ६२ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. चांदीचे तीन महिन्यातील हे उचांकी भाव आहे. या सोबतच सोन्याच्याही भावात ६०० रुपयांची वाढ होऊन सव्वा महिन्यानंतर ते पुन्हा ५२ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. 

ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ६० हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात घसरण होत जाऊन ती १ सप्टेंबरपर्यंत ५२ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर तिच्या भावात वाढ होत गेली. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात चढ-उतार सुरू राहिल्यांनतर २९ सप्टेंबरनंतर तिच्या भावात पुन्हा वाढ होत गेली. ३० सप्टेंबर रोजी २०० रुपयांची वाढ होऊन ५७ हजार रुपयांवर चांदीचे भाव पोहचले. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन ती ५७ हजार ५०० रुपयांवर पोहचली. दोन दिवस याच भावावर स्थिर राहिल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी ५०० रुपयांची घसरण झाली व चांदी ५७ हजार रुपये प्रति किलोवर आली. त्यानंतर मात्र मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी चांदीत थेट पाच हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी थेट ६२ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. या पूर्वी १ जुलै रोजी चांदीचे भाव ६२ हजार रुपयांवर होते. त्यामुळे तीन महिन्यांनंतर चांदी पुन्हा एकदा उचांकीवर पोहचली आहे. 

सव्वा महिन्यानंतर सोने पुन्हा ५२ हजारी

चांदी सोबतच मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी सोन्याच्याही भावात ६०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ५२ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. या पूर्वी २८ ऑगस्ट रोजी सोने ५२ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर होते. त्यानंतर त्याचे भाव कमी होऊन ५० ते ५१ हजार रुपयांच्या दरम्यान होते. आता सव्वा महिन्यानंतर सोने पुन्हा ५२ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. 

गेल्या दोन वर्षातील चांदीतील मोठी भाववाढ

दिनांक - वाढ- भाव
५ ऑगस्ट २०२० - ४,५०० - ७१,०००
६ ऑगस्ट २०२० - २५००-७३,५००
७ ऑगस्ट २०२० - ५०००-७७,५०० (यानंतर तीन ते चार दिवस घसरण झाली होती)
१३ ऑगस्ट २०२० - ४००० - ६७,५००
१ जुलै २०२२ - १८०० - ६२,०००
२९ जुलै २०२२ - २७०० - ५९,०००
९ ऑगस्ट २०२२ -१२००-६०,०००
१३ सप्टेंबर २०२२ - १००० - ५७,८००
२३ सप्टेंबर - १२,००-५८,७००
४ ऑक्टोबर २०२२ - ५०००-६२,०००

नवरात्रोत्सवात सोने-चांदीला मोठी मागणी असून विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर ही मागणी अधिक वाढली. त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील मागणी वाढल्याने चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. 

- सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक.

Web Title: Silver price increased by 5 thousand in a single day, gold also increased by 600 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.