पावडरच्या डब्यात सीमकार्ड टाकणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 08:27 PM2020-09-24T20:27:10+5:302020-09-24T20:27:20+5:30
बंदी पलायन प्रकरण : दुचाकीही जप्त
जळगाव : कारागृहातून पलायन करण्यापूर्वी बंदी ज्या मोबाईलवरुन बोलत होते, त्यातील सीमकार्ड कारागृहात पोहचविण्यासाठी मदत करणाऱ्या सागर उर्फ कमलाकर सुभाष पाटील (२४, रा.तांबापुरा, अमळनेर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. सागर उर्फ कमलाकर पाटील यानेच सीमकार्ड घेऊन पावडरच्या डब्यात टाकले व तो डबा आणि हे साहित्य पोहचविण्यासाठी दुचाकी नागेश पिंगळेला दिली होती, असेही तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात ११ जणांना आरोपी करण्यात आलेले असून त्यापैकी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित सुशील मगरेसह इतर दोन अशा तिघांना अद्याप अटक झालेली नाही. या गुन्ह्याचा तपास अतिशय वेगाने होत असून त्यात पोलिसांना यशही मिळत आहे. सीमकार्डच्याबाबत सखोल तपासाच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना दिल्या होत्या. त्यानुसार चौकशी सागर उर्फ कमलाकर हा निष्पन्न झाला होता. सहायक फौजदार नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, दीपक शिंदे, प्रवीण हिवराळे यांच्यासह सहायक फौजदार विजय पाटील, दत्तात्रय बडगुजर, नरेंद्र वारुळे व किरण चौधरी यांनीच सागरला निष्पन्न करुन अमळनेरातून अटक केली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.