केटी वेअर असूनही नसल्यासारखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:02 PM2018-05-21T22:02:12+5:302018-05-21T22:02:12+5:30
कजगाव : केटी वेअरच्या प्लेटांचे रबर खराब झाल्याने होते पाण्याची गळती, बंधाऱ्याच्या पायावर स्लॅबची गरज
आॅनलाई लोकमत
कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव, दि. २१ : कजगाव, उमरखेड व पासर्डी या तीन गावालगत तितूर नदीपात्रात साधारण पावणेतीन कोटी रुपये खर्चाचे तीन के.टी.वेअर सन २००७ मध्ये बनविण्यात आले. या तिघे के.टी.वेअरचे काही काम निधीअभावी अपूर्ण पडले तर के.टी.वेअरच्या प्लेटांचे रबर खराब झाल्याने गळती थांबत नसल्याने यात पाण्याचा साठा होत नाही.
या तिघा के.टी. वेअरची स्थिती ही ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशीच काहीशी झाली आहे. या महत्त्वपूर्ण बाबीकडे आमदार किशोर पाटील यांनी लक्ष देऊन अपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करावा. या के.टी.वेअरच्या पायावर एक ते दीड मीटरच्या स्लॅबची पडदी ओतण्याची गरज आहे. जेणेकरून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी येथे अडेल व पाण्याचा साठा येथे होणार आहे.
सन २००६ मध्ये कजगाव, उमरखेड, पासर्डी या तीन गावांसाठी तीन के.टी. वेअर मंजूर करण्यात आले. यात कजगावच्या के.टी. वेअरसाठी अंदाजे एक कोटी तेरा लाख रुपये खर्च झाले.
याची पाणी अडविण्याची क्षमता अंदाजे ३८ दशलक्ष घनफुट तसेच बुडीत क्षेत्र साधारण अडीच ते तीन किलोमीटर, उमरखेड येथील के.टी. वेअरसाठी अंदाजे ७९ लाख रुपये खर्च झाले. याची पाणी अडविण्याची क्षमता १९ दशलक्ष घनफुट तसेच बुडीत क्षेत्र साधारण दोन ते अडीच किलोमीटर, तर पासर्डी येथील के.टी. वेअरसाठी अंदाजे ८२ लाख रुपये खर्च झाले.
याची पाणी अडविण्याची क्षमता अंदाजे १८.५ दशलक्ष घनफुट तसेच बुडीत क्षेत्र दोन ते अडीच किलोमीटर असे हे अंदाजे पावणेतीन कोटी रुपयांचे भव्य के.टी. वेअर या भागात उभे झाल्याने हा परिसर सुजलाम सुफलाम होईल, पुन्हा या भागात केळी बहरेल, पासर्डी ते उमरखेड या दरम्यानची शेती मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येईल, या आशेवर सारेच होते.
मात्र के.टी. वेअरच्या अपूर्ण कामामुळे पाहिजे त्या प्रमाणात या के.टी. वेअरमध्ये पाणी अडविता येत नव्हते, तर काही प्रमाणात अडकलेल्या पाण्यास प्लेटांच्या गळतीमुळे अडकलेले पाणी वाहून जात असल्याने के.टी. वेअर कोरडा पडत असतो. यामुळे हे के.टी.वेअर असूनही नसल्यासारखेच झाले आहे.
आठ गावांना मोठ्या प्रमाणात पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार
कजगाव, उमरखेड, तांदुळवाडी, पिंप्री, भोरटेक, घुसर्डी, पासर्डी, मळगाव या गावांना केवळ तितूर नदीचा सहारा आहे. कारण गिरणेच्या लाभ क्षेत्रामध्ये जरी ही गावे मोडली जातात तरी मात्र कोणताही लाभ या गावांना गिरणेचा नाही. सारी दारोमदार तितूर नदीवर आहे आणि या नदीच्या प्रवाहात अनेक सिमेंट बंधारे बनत असल्याने प्रत्येक गावाचे पाणी त्या-त्या बंधाºयात अडकत असल्याने पाणी खालच्या गावापर्यंत पोहचत नसल्याने या आठ गावांची स्थिती भविष्यात फार बिकट होऊ शकते. कारण या नदीवर अनेक ठिकाणी विनागेटचे सिमेंट बंधारे बनविण्यात आले असल्याने या नदीचे पाणी भडगाव व पाचोरा तालुक्यातील या आठ गावात पोहचणार नाही. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बागायत शेतीचा प्रश्न उभा राहू शकतो. यासाठी ठोस अशी उपाययोजना होणे गरजेचे आहे.