स्मार्टकार्डसाठी एकच संगणक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:15 PM2019-07-01T12:15:06+5:302019-07-01T12:16:41+5:30
एस.टी. पासेस : ५ हजार विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी लागणार दोन महिने
जळगाव : एस.टी.महामंडळातर्फे विद्यार्थ्यांनादेखील स्मार्टकार्ड देण्यात येणार आहेत. सध्या स्मार्टकार्डची नोंदणी केल्यावरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक पास देण्यात आहे. या स्मार्टकार्डच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांच्या पहाटेपासूनच रांगा लागत आहेत. मात्र, नोंदणीसाठी एकच संगणक असल्यामुळेसंथ गतीने कामकाज सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण ५ हजार विद्यार्थ्यांना पास मिळण्यासाठी दोन महिने लागणार आहेत.
बनावटगिरीला आळा घालण्यासाठी परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक व शासनाच्या पुरस्कारप्राप्त नागरिकांना ‘आधारकार्ड ’ क्रमाकांशी जोडलेले स्मार्टकार्ड दिले जात आहे. यासाठी महिनाभरापासून नवीन बस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांची स्मार्टकार्डसाठी नोंदणी सुरु आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांनादेखील स्मार्टकार्ड दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दर महिन्याला दिला जाणारा कागदी पास बंद होणार आहे. विशेष म्हणजे स्मार्टकार्डची नोंदणी केल्यावरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक पासेसमिळणार आहेत. विद्यार्थ्यांनाही लवकर पास मिळण्यासाठी महामंडळातर्फे पहाटे सहा ते रात्री नऊपर्यंत नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
एकच संगणक असल्यामुळे संथ गतीने कामकाज
स्मार्टकार्डच्या नोंदणीसाठी विद्यार्थी पहाटे साडेपाच पासूनच रांगा लावत आहेत. सकाळी सातपर्यंत १०० ते १५० रांगेत उभे असतात. आॅनलाईनद्वारे एका विद्यार्थ्यांच्या स्मार्टकार्डसाठी १० ते १५ मिनिटे लागतात. बऱ्याचवेळा सर्व्हर संथ गतीने सुरु असल्याचा प्रकार घडत असल्यामुळे एका विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी अर्धातास देखील लागत आहे. त्यात एकच संगणक असल्यामुळे, अतिशय संथ गतीने स्मार्टकार्डची नोंदणी सुरु आहे. दिवसभरात रांगेत उभे असलेल्या २०० ते २५० विद्यार्थ्यांपैकी फक्त ६० ते ७० विद्यार्थ्यांची नोंदणी होत आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करुन, त्यांना पुन्हा दुसºया दिवशी स्मार्टकार्डच्या नोंदणीसाठी बोलावण्यात येत आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे रांगेत उभे असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. स्मार्टकार्डची नोंदणी लवकर होण्यासाठी ४ ते ५ संगणक उपलब्ध करुन देण्याची मागणी आहे.