साहेब, दवाखान्यात जातोय....मेडिकलला जातोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:53+5:302021-04-13T04:14:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून बाधित रुग्णांचा रोजचा आकडा हजारांच्यावर आहे. बाधित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून बाधित रुग्णांचा रोजचा आकडा हजारांच्यावर आहे. बाधित मृत्यूची रोजची संख्या पंधराच्यावर आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू करून वीकेंडला लाॅकडाऊन जारी केले आहे. या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडणे अपेक्षित नाहीच. आता तर चाचणी करणे अनिवार्य केले असून निगेटिव्ह रिपोर्ट असला तरच कारवाईतून सूट मिळणार आहे. रिपोर्ट नसेल तर बाहेर फिरता येणार नाही. तरीदेखील नागरिक दवाखाना, मेडिकल, भाजीपाला व किराणा आदी कारणे सांगून बाहेर वावरताहेत. भाजीबाजारातही गर्दी वाढत चालली आहे.
दरम्यान, ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्याला काही त्रास होत नसला तरी त्याच्यापासून मधुमेह व इतर आजार असलेले किंवा लहान मुले, वृद्धांना कोरोनाची पटकन लागण होत आहे. अशानेच रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन मिळेनासा झाला आहे.या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. चौकाचौकांत स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी तसेच पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. या कर्मचाऱ्यांनी ज्याला अडविले त्याच्याकडून 'साहेब, नातेवाईक रुग्णालयात दाखल आहे', डबा द्यायला चाललो, बिलाचा भरणा करायचा आहे. मेडिकलवरुन औषधी घ्यायची आहे, अशी कारणे सांगितली जात आहेत.
अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना पाचशे, दोनशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. पोलिसांकडूनही प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसूल केला जात आहे. त्याशिवाय कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले जात आहेत. शनिवारी व रविवारी या दोन दिवसांत २८२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांच्या या अशा वागण्याने निष्पाप लोकांचा जीव जात आहे. ज्याच्या घरातील व्यक्ती कोरोनाने मृत झाली, त्या व्यक्तीचा मृतदेहदेखील ताब्यात मिळत नाही, त्यामुळे त्यांचे दु:ख व गांभीर्य त्या कुटुंबालाच आहे.
रविवारी ३७ हजारांचा दंड वसूल
पोलिसांनी रविवारी १५७ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या दहा जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून साडेतीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. असा एकूण ३७ हजार ६०० रुपये दंड रविवारी वसूल करण्यात आला.
शनिवारी ९२ हजारांचा दंड वसूल
वीकेंडच्या पहिल्या दिवशी अर्थात शनिवारी घराबाहेर पडणाऱ्या ३४३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ९२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याशिवाय निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या २३ जणांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून १० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. असा एकूण ९२ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.