साहेब, रुग्णालयात, अंत्यसंस्काराला जातोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:32+5:302021-04-28T04:17:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी बसेस सुरू आहेत. असे असतानाही काही प्रवासी ...

Sir, in the hospital, going to the funeral | साहेब, रुग्णालयात, अंत्यसंस्काराला जातोय

साहेब, रुग्णालयात, अंत्यसंस्काराला जातोय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी बसेस सुरू आहेत. असे असतानाही काही प्रवासी रुग्णालयात जायचे आहे, अंत्यसंस्काराला जायचे आहे, अशा प्रकारची तीच ती कारणे देऊन घराबाहेर पडून, प्रवास करत असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.

राज्य शासनाने कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी महामंडळाची बससेवा बंद ठेवली असून, फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांसाठीच बससेवा सुरू ठेवली आहे, तर ज्या नागरिकांना बसने प्रवास करायचा आहे, त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सेवेचा पास काढण्याचे बंधनकारक केले आहे. मात्र, असे असतानाही अनेक नागरिक या-ना त्या प्रकारची कारणे सांगून बसने प्रवास करतच आहेत. यामध्ये विशेषतः एखाद्या ग्रामीण मार्गावरून शहरात बस येताना हे प्रवासी वाहकाने प्रवासाचे कारण विचारल्यावर, साहेब तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात जायचे आहे, कधी जवळच्या नातलगाला रुग्णालयात भेटायला जायचे आहे, तर कधी अंत्यसंस्काराला जायचे आहे, अशी कारणे देऊन बसमधून प्रवास करतात. ही कारणे सांगितल्यामुळे बस वाहकही जास्त चौकशी न करता प्रवेश देतो. दरम्यान, काही वाहक प्रवाशांकडून प्रवासासाठी जिल्हा प्रशासनाचा पास मागत असल्याने, या कारणावरून प्रवाशी व वाहकांमध्ये किरकोळ वादही घडत असल्याचे प्रकार घडत आहेत.

इन्फो :

- जिल्ह्यातील एकूण आगार - ११

- सध्या चालविल्या जाणाऱ्या बसेस - १० ते १२

- दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या १०० ते १५०

इन्फो :

प्रवाशांकडून तीच ती कारणे :

शासनातर्फे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीला दहा ते बारा दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, संचारबंदीच्या सुरुवातीपासूनच नागरिकांतर्फे विविध कारणांनी नागरिक प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. यात सुरुवातीपासूनच रुग्णालयात आणि अंत्यसंस्काराला जाण्याची ही दोन महत्त्वाची कारणे सांगत आहेत. तर बोटावर मोजण्याइतक्याच नागरिकांकडून या कारणासाठी रितसर शासनाच्या परवानगीचा पास असतो, तर बहुतांश नागरिकांकडे कुठलाही पास नसल्याने, विविध प्रकारची कारणे सांगून प्रवास करत असल्याचे दिसून आले.

पाचोरा, चाळीसगाव मार्गावर गर्दी

सध्या महामंडळातर्फे अत्यावश्यक सेवेसाठीच बससेवा सुरू आहे. यामध्ये पाचोरा, चाळीसगाव मार्गावरच प्रवाशांची जास्त गर्दी आहे. कारण, या भागातील बहुतांश नागरिक जळगावात विविध शासकीय आस्थापने व आरोग्यसेवेत नोकरीला आहेत. सकाळी ३० ते ४० प्रवासी व सायंकाळी पुन्हा तितकेच प्रवासी बसने प्रवास करत आहेत. रेल्वेला आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नसल्याने हा नोकरदार वर्ग बसने प्रवास करत आहे.

इन्फो :

एसटी कर्मचाऱ्यांसोबत वाद-

सध्या संचारबंदीत अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. तसेच या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहूनच बसमध्ये प्रवेश दिला जात आहे. मात्र, ज्यांच्याकडे प्रवासासाठी आवश्यक सेवेचा कुठलाही पास नसल्यामुळे त्या प्रवाशाला प्रवासास परवानगी मिळत नसल्याने वाहक व त्या प्रवाशात वाद होत आहेत.

इन्फो :

सध्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच सेवा असून, प्रत्येकाचे ओळखपत्र पाहूनच बसमध्ये प्रवेश दिला जातो. तसे नसेल तर प्रवेश दिला जात नाही. मात्र, प्रवाशांनी रुग्णालयाचे किंवा अंत्यसंस्काराचे कारण सांगितल्यावर प्रवेश दिला जातो. मात्र, त्यावेळेसही आमचे वाहक खात्री करूनच बसमध्ये प्रवेश देतात.

प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार

Web Title: Sir, in the hospital, going to the funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.