सर सलामत तो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:04 AM2018-07-27T11:04:24+5:302018-07-27T11:05:58+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये हसु भाषिते’ या सदरात धुळे येथील साहित्यिक प्रा.अनिल सोनार यांनी आपल्या लेखनात घेतलेले चिमटे...
आधीच नाना गरम डोक्याचा. आता तर त्याचा चेहराही लालबुंद झालेला होता. मी ओळखलं; आज बहुदा आपलं श्राद्ध घातलं जाणार. ‘ये बस, म्हणायचाही अवधी न देता नानाने माझ्या श्राद्धाचे मंत्र म्हणायला सुरुवात केली. ‘काय रे, स्तंभ्या, आम्हा सामान्य माणसांच्या ‘डोक्या’वर तीन स्तंभ खरडतोस.
तुझ्यासारखे पांढरपेशे बुद्धिविके डोकं सोेडून काय काय गहाण ठेवतात. ते कळू दे की जगाला एकदा.’ मी नानाला शांत करत म्हणालो, ‘हे बघ नाना, तुम्हाला तर एकच डोकं गहाण ठेवावं लागत असेल. पण माझ्यासारख्याला तर रावणारसारखी दहा-दहा डोकी असतात. गहाण ठेवायला अपुरी पडू नयेत म्हणून निसर्गानेच ही आमच्यासारख्यांसाठी सोय करून ठेवलेली आहे. मी विचार करतो की निसर्गाने मला डोके दिले नसते तर मी वेळोवेळी काय गहाण ठेवले असते. दरिद्री माणसाजवळ गहाण ठेवण्यासाठी कोणती न कोणती वस्तू हवीच असते. भारत देश हा दारिद्र्याच्या बाबतीत खूपच समृद्ध देश आहे. इतरांच्याबाबतीत आपण कशाला बोला, पण मी मात्र डोके गहाण ठेवून त्या बदल्यात परंपरेने चालत आलेले संपन्न जीवन जगण्यात यशस्वी झालेलो आहे. माझी शरीर प्रकृती तोळामासा असल्यामुळे काहीही दुखावून घेणे मला परवडणारे नाही. इथेही निसर्ग माझ्या मदतीला मॅरेथॉन स्पर्धेतल्या सारखा धावून आला आहे. त्याने भावना नावाची एक अजब गोष्ट मला बहाल केली आहे. काही दुखावण्याची वेळ आली की ती पटकन पुढे होते व स्वत:ला दुखापत करून घेते. इतरांबाबत आपण कशाला बोला पण माझी भावना केव्हा, कधी, कशामुळे आणि कितपत दुखावली जाईल हे मानसशास्त्रज्ञालाही सांगता येणार नाही. माझ्यावर असले दुर्धर प्रसंग आणणाऱ्या संशोधक, अभ्यासक, स्पष्टवक्ते समाजसुधारक यांचा मी तीव्र निषेध करतो.
आता हे पहा. मी सर्वधर्म समभाव मानणारा माणूस आहे. महानुभावपंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी हिंदूंच्या सर्व देवता त्याज्य मानल्या आहेत. हिंदू म्हणून माझ्या भावना दुखावणार की नाही? श्री चक्रधर स्वामींची हत्या हेमाडपंत ह्या सनातन हिंदू प्रधानाने करविली. महानुभाव पंथीय म्हणून माझ्या भावना दुखावणार की नाही? साक्षात श्रीकृष्णाचा अवतार असलेले स्वामी मरू कसे शकतील, म्हणून पंथीय त्यांनी ‘उत्तरापंथे गमन’ केले यावर श्रद्धा ठेवतात. आता इथे माझ्यातल्या बुद्धिजीवी, ईहवादी संशोधकांचे मन दुखावले जाणार की नाही?
हे बघ नाना, भलेही माझ्या श्रद्धास्थाने पराकोटीची अहिंसा सांगितली असेल. माझ्या भावना दुखावणाºयाला मी ठोकल्याशिवाय... आयमीन त्याच्यावर कोर्टात केस ठोकल्याशिवाय मी राहीन काय आणि हे बघ, डोके असले तरी काय झाले. एकावेळी त्याचा एका ठिकाणीच गहाण ठेवण्यासाठी उपयोग होतो. म्हणून आमच्यासारख्या पांढरपेशा बुद्धिजीवी लोकांना रावणासारखी दहा-दहा डोकी बाळगावी लागतात. तुला सांगतो की ह्यामुळेच उदारमतवादी, सहिष्णू व्यक्तिमत्त्व म्हणून समाजात लौकिक वाढतो. आहेस कुठे!’
नानाने वासलेला ‘आ’ काही केल्या मिटेना. मी त्याचा खांदा थोपटत म्हणालो, ‘‘सत्याचा शोध आणि त्याचा मनापासून स्वीकार करायला शिकवणारे मतस्वातंत्र्याचे वैचारिक पर्यावरण शिल्लक आहे का महाराष्ट्रात!’’
- प्रा.अनिल सोनार, धुळे