साहेब... ५०० रुपयांचे पीपीई किट कोठून आणू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:53+5:302021-05-17T04:13:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : माझी आई गंभीर आहे, तिला उठता येत नाही...मी गेल्याशिवाय ती जेवणार नाही...आमच्या सासूबाई चार ...

Sir ... where can I get a PPE kit of Rs. 500? | साहेब... ५०० रुपयांचे पीपीई किट कोठून आणू?

साहेब... ५०० रुपयांचे पीपीई किट कोठून आणू?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : माझी आई गंभीर आहे, तिला उठता येत नाही...मी गेल्याशिवाय ती जेवणार नाही...आमच्या सासूबाई चार दिवसांपासून पाणी प्यायलेल्या नाहीत, आम्हाला आत सोडा अशी आर्त हाक नातेवाईक लगावत होते. मात्र, प्रशासकीय नव्या नियमाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाचे हात बांधले होते. एका रुग्णाचा एकच नातेवाईक व तोही पीपीई किट घालूनच आत जाऊ शकेल, असा नियम लावताच नातेवाइकांचा संताप अनावर झाला व गेटवरच गोंधळ, आरडाओरड, यासह नातेवाइकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी ११ ते दीड वाजेपर्यंत हा सर्व गोंधळ सुरू होता. पोलिसांचा मोठा फौजफाटा ही परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी बोलाविण्यात आला होता.

शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पिटलसाठी काही नवीन नियम जाहीर केले आहेत. त्याची अंमलबजावणी रविवारी सकाळपासूनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आली. या नवीन आदेशाची प्रत ही मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आली. सकाळी अकरापासून नातेवाइकांची गर्दी उसळल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना विरोध केल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. अनेक महिलांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले व आत सोडण्याची मागणी केली. काही नातेवाइकांनी गेटचा ताबा घेत जोरजोरात गेट ढकलण्याचा प्रयत्न केला. तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मग त्यांनी गेटचा ताबा घेतला. नातेवाइकांनी त्यांच्या समोर व्यथा मांडल्या. मात्र, प्रशासनाच्या नियमानुसारच नातेवाइकांना आत सोडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पीपीई किट आणणार कुठून

रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून नातेवाइकांना बंदी करण्यात आली आहे. हे नातेवाईक गेटच्या समोरच बसून असतात. आम्ही रस्त्यावर थांबलेलो आहोत. गरीब परिस्थिती असताना महागडे पीपीई किट केवळ एका भेटीसाठी कुठून खरेदी करणार, असा सवाल नातेवाईक उपस्थित करीत होते.

पीपीई किटच्या किमती वाढविल्या?

कोणाला पीपीई किट २५०, तर कुणाला ४०० रुपयात मिळत होते. काही नातेवाइकांनी ५०० रुपयाला एक किट आणून रुग्णांची भेट घेतली होती. वेगवेगळ्या किमतीशिवाय प्रत्येकाला ते घेणे शक्य नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. सुरक्षा रक्षक विना पीपीई किट कुणालाच आत सोडत नसल्याने गोंधळ अधिकच वाढला होता. नातेवाइकांनी रुग्णालयाच्या गेटवरच गर्दी केली होती. अनेक नातेवाईक सुरक्षा रक्षकांना व पोलिसांना विनवण्या करीत होते.

नंतर ५० किट उपलब्ध

नातेवाइकांची तळमळ व आवश्यकता पाहून अखेर रुग्णालय प्रशासनाकडून नातेवाइकांसाठी ५० पीपीई किट उपलब्ध करून देण्यात आले. आणखी ५० किट आणणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. एका वेळी पाच नातेवाइकांना गेटमधून आत प्रवेश देण्यात येत होता. यातही ज्यांच्याकडे जेवणाचे डबे आहेत, त्यांनाच प्राधान्याने सोडण्यात येत होते.

काय आहेत आदेश

कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ केअर सेंटर, तसेच कोविड हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांना चहा, नाश्ता, जेवण इ. रुग्णालय प्रशासनामार्फत पुरविले जाते. मात्र, कोविड रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक वारंवार रुग्णांना भेटण्यासाठी जात असतात, यामुळे त्यांना कोविडची बाधा होऊ शकते व त्यांच्याकडून दुसऱ्यांना बाधा होण्याचा धोका आहे. जिल्ह्यातील सर्व कोविड हाॅस्पिटल यांनी कोणत्याही रुग्णाच्या नातेवाइकाला कोविड वाॅर्डमध्ये सोडू नये, अत्यावश्यक बाब असेल तर रुग्णाचे व नातेवाइकांचे व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोलणे करून द्यावे, कोणते साहित्य द्यायचे असल्यास ते व्यवस्थापनामार्फत दिले जावे, अत्यावश्यक बाब असल्यास एका रुग्णाच्या एक किंवा दोन नातेवाइकांना पीपीई किट परिधान करूनच आत सोडावे, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी दिले आहेत.

आईला बघायला जाऊ द्या.. संध्याकाळी नक्की पीपीई किट आणतो

एक तरुण गेटच्या आत आल्यानंतर आईची तब्बेत एकदम गंभीर आहे, तिला थायरॉइडचा त्रास आहे. सर, मला आता आत जाऊ द्या, आईला, जेवण आणि औषधीशिवाय कपडे देऊ द्या, मी संध्याकाळी नक्की पीपीई किट आणतो, अशी विनवणी हा तरुण करीत होता. अखेर अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी त्याला रुग्णालयातून पीपीई किट उपलब्ध करून देत आतमध्ये सोडले.

आई बारा दिवसांपासून दाखल आहे. आईला जेवण देण्यासाठी आलो होतो. अचानक पीपीई किट बंधनकारक केले. अखेर व्हिडिओ कॉलद्वारे आईशी संवाद साधला, प्रशासनाने अचानक असा नियम बदलवून नातेवाइकांची परीक्षा बघायला नको, रुग्ण नातेवाइकांना बघूनच अर्धे बरे होतात, अन्यथा ते खचतात- एक नातेवाईक.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या आदेशानुसार नातेवाइकांना आत सोडले जात आहे. रुग्णांना आमच्या किचनमधूनच उत्तम प्रकारचे जेवण दिले जाते. मात्र, नातेवाइकांची इच्छा असते की रुग्णाला सूप मिळावे, दुसरे काही मिळावे, त्यानुसार आम्ही सेवालयातून त्यांचे डबे पोहोचते करीत आहोत. - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता.

Web Title: Sir ... where can I get a PPE kit of Rs. 500?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.