बहिणाबाईच्या काव्यातील स्त्री भावविश्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:45 PM2018-06-04T23:45:23+5:302018-06-04T23:45:23+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘चाळता स्मृतीची पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील यांचा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावरील विशेष लेख.
बहिणाबाईच्या काव्यामध्ये स्त्रीचे भावविश्व अतिशय तरलपणे चित्रित झालेले आहे. बहिणाबार्इंचा कालखंड म्हणजे स्त्री जीवनाचा खडतर काळ. बंदिस्त जीवन. फारसं स्वातंत्र्य नाही. कोवळ्या वयात होणारी लग्नं, बऱ्याच घरांमध्ये होणारा सासुरवास, अशा संसारात स्त्रिचीच अधिक परवड होते. एक स्त्री म्हणून बहिणाबाई हे सर्व जाणून होती. आपल्या ‘संस्कार’ नामक कवितेमध्ये बहिणाबाईने आदर्श संस्काराचे चित्र रेखाटलेले आहे.
देखा संसार संसार,
दोन्ही जीवाचा इचार,
देतो दु:खाले होकार,
अन् सुखाले नकार’’
संसार म्हणजे केवळ एकाचा, अर्थात केवळ पुरुषाचाच विचार नव्हे तर पती-पत्नी दोघांचा विचार महत्त्वाचा असून, दोघांच्या संयुक्तीक प्रयत्नांनी, विचारांनी संसाराचा गाडा सुरळीत चालू शकतो. संसारात एकमेकांची दु:ख वाटून हलकी करणे म्हणजे पती-पत्नीने एकमेकाला आधार देणे होय. खीरा, भिलावा, सागरगोट्या यासारख्या नित्य परिचयाच्या गोष्टीतून ती संसाराचे मर्म स्पष्ट करते. वरवर बघता संसार क्लेशकारक वाटत असला तरी तो आतून गोडंबीसारखा गोड, मधूर असतो.
या सर्व परिस्थितीत स्त्रिला तिच्या माहेराची ओढ अधिक तीव्रतेने होत असते. माहेराची उत्कट माया तिच्या हृदयाशी जोडलेली असते. त्यामुळे माहेराचा निरोप वारा तिच्या कानात सांगतो. माहेराच्या या भावनिक मायेचे असे संबंध असल्यामुळे रखरखीत उन्हात तापलेला रस्तासुद्धा तिला मखमली वाटेसारखा वाटतो. माहेराच्या वाटेवरच्या दगडाची ठेच लागली तर तो दगड तिला धडपड न करता नीट जाण्याचा सल्ला मोठ्या आपुलकीनं देतो. रस्त्याने जात असताना उचकी लागली म्हणजे माहेरच्या माणसांनी आठवण केली हा विश्वास असतो. एवढेच नाही तर माहेरी जात असताना रस्त्यात भेटलेली साळुंखी तिच्यापुढे जाऊन बहिणाबाईच्या आईला ती येत असल्याची बातमी देते. माहेर म्हटलं म्हणजे तिथल्या सर्व आठवणी दाटून येतात. माहेरुन घर, माहेरची माणसं, रस्त्यात लागणारी नदी, पानांचे तांडे, रेल्वे फाटक, बाभळीचं वन अशा असंख्य आठवणी मनात फेर धरतात.
तत्कालीन समाजजीवनामध्ये सासुरवाशिणीला करावे लागणारे निरंतर कष्ट हे नित्याचेच होते. शेतकरी कुटुंबात तर कष्टांना पर्यायच नव्हता. बहिणाबाई सासुरवाशिणीला वाद न घालता सर्व सहन करण्याचा सल्ला देते व अशावेळी माहेरची आठवण मनात जागवायला सांगते. माहेरची आठवण म्हणजे कष्टांवर, दु:खावर हळूवार फुंकर घालण्यासारखे आहे. माहेरच्या प्रेमाची आठवण दु:ख सहन करण्याची ताकद देते. त्यामुळे वाद न वाढता घरातच मिटतो व घराची इभ्रतही कायम राहते. ‘योगी आणि सासुरवाशिण’ रचनेत योगी व सासुरवाशिणीच्या संवादाद्वारे तत्कालीन स्त्री जीवनाचे चित्रण बहिणाबाईने प्रभावीपणे केले आहे. ‘माहेराचं गाणं सारखं काय गाते, मग सासरी कशासाठी आली?’ योग्याच्या या प्रश्नावर बहिणाबाई उत्तर देते,
‘‘अरे लागले डोहाये,
सांगे शेतातली माटी
गाते माहेराचं गान लेक येईन रे पोटी
देरे देरे योग्य ध्यान, ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’’
अशा समर्पक शब्दात ती योग्याला निरुत्तर करते. अतिशय संवेदनशीलतेने बहिणाबाईने तत्कालीन स्त्री जीवनाचे तरल व प्रभावी चित्रण केलेले आहे.
- प्रा.ए.बी. पाटील